.... अण् नामांतरा साठी आमचाही ९० किलो मिटर अंतराचा रात्रीचा सायकल मार्च...! - अॅड.मिलिंद सर्पे, - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 13 January 2024

.... अण् नामांतरा साठी आमचाही ९० किलो मिटर अंतराचा रात्रीचा सायकल मार्च...! - अॅड.मिलिंद सर्पे,


   मराठवाडा विद्यापीठाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे नांव द्यावे ,अशी चळवळ "दलित पॅंथर',या संघटनेकडून मराठवाड्यात सुरु झालेली होती.तो काळ होता १९७७ चा. मी तेंव्हा होतो सातवीत.प्रा.धन्वे सरांनी  मला शिशु दलित पॅंथरचा अध्यक्ष केले होते.२७ जुलै १९७८ ला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा  ठराव एकमताने मंजूर झाला खरा परंतु , त्या नंतर २७ जुलै च्या  रात्रीपासून मराठवाड्यातील दलित समाजावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार सुरु झाले.मराठवाड्यातील दलित वस्त्या १५ दिवस जळत होत्या . मराठवाडा ठप्प झाला होता.नामांतराची अंमलबजावणी झाली नाही.पुढे चालून १४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर न होता नामविस्तार झाले, "डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद."

    नामांतर चळवळीचा मोठा इतिहास आहे.या चळवळीत माझा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत दादाराव कयापाक,सुरेश गायकवाड,मनोहर भगत,सुखदेव मुनेश्वर यांच्या नेतृत्वाखाली माझा सहभाग होता.तो खारीचा असलातरी फारच स्फुर्तिदायक होता , असे मला आजही वाटते.

 नामांतराचा लढा सुरू झाला तेंव्हा मी सातवीत होतो.वय होते १२ वर्षे.नामांतर झाले १९९४. तेंव्हा मी याच मराठवाडा विद्यापीठातून तीन पदव्या घेऊन बाहेर पडलो होतो.नामांतर लढ्यात सहभागी असलेला मी एक भीमसैनिक असल्याने या चळवळीत अनेक  आठवणी माझ्या स्मृतीत आजहि ताज्या तवान्या आहेत.

   आज १४ जानेवारी. नामविस्तार दिनानिमित्त नामांतर चळवळीतील एक अनुभव मी आपणास सांगणार आहे.तो असा....

 ते नामांतर चळवळीतील भारावलेले दिवस होते.नामांतराच्या संदर्भाने गोकुळ गोंडेगाव येथे "दलित पॅंथर" च्या वतीने जाहिर सभेचे रात्री आयोजन करण्यात आले होते.बहुदा १९७७ चेच साल असावे.दलित पॅंथर चे कार्यकर्ते किनवटहून शेवटच्या सायंकाळ च्या बसने रवाना झाले.यात प्रा.पी.एस.धन्वे, दादाराव कयापाक,सुरेश गायकवाड,सुखदेव मुनेश्वर, नितिन कावळे इत्यादींचा समावेश होता.मी सहावित असल्याने माझ्याकडे गोकुळ गोंडेगाव ला एस.टी.ने जाण्यासाठी पैसे असण्याचा प्रश्नच नव्हता.परंतु, सभेला जायायची माझी तीव्र इच्छा होती.म्हणतात ना की,'ईच्छा तेथे मार्ग'.मी गोकुळ गोंडेगाव ला  सायकलने जाण्याची तयारी केली.यासाठी मी माझे बालमित्र प्रकाश पाटील व दिलिप कावळे यांना तयार केले व आम्हि तीघे बाल मित्र किरायाच्या दोन सायकली घेऊन निघालो रात्री आठ वाजता सांगण्यासारखे म्हणजे ती रात्र होती अमास्याची,काळाकुट अंधार  व  कच्चे रस्ते.  रस्त्याने किनवट ते गोकुळ हे अंतर आहे अंदाजे ४५ किलो  मिटर कच्चा व जंगल व्याप्त रस्ता.ही रात्रपार करुन आम्हि  पोंहलो रात्री दोन वाजता गोकुळ गोंडेगाव ला.मला त्या काळात ब-यापैकी भाषण करता येत असलेल्याने  तेथे माझे भाषण झाले.यानंतर आम्हि जेवन करुन परतीच्या प्रवासाला निघालो रात्री चार वाजता व पडत उठत किनवटला पोंहचलो दुपारी ११ च्या  सुमारास ‌.घरातली ज्वारी चोरुन विकली आणि सायकलचा किराणा दिला.

   ही घटना जरी छोटी वाटत असली तरी चळवळीच्या दृष्टीने फार मोठी आहे, असे मला वाटते .म्हणूनच आजच्या नामांतर दिनानिमित्ताने बालवयातील  ९० किलो मिटरच्या विशेष म्हणजे रात्रीच्या सायकल मार्चची ही घटना शेअर केली आहे.

                      

                                                   -       अॅड.मिलिंद सर्पे,

                                                        

No comments:

Post a Comment

Pages