एनसीसी च्या सीएटीसी कॅम्पची सांस्कृतीक कार्यक्रमाने सांगता - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 19 January 2024

एनसीसी च्या सीएटीसी कॅम्पची सांस्कृतीक कार्यक्रमाने सांगता


किनवट (बातमीदार): कोठारी (चि.ता.किनवट) येथील मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मिडीयम शाळेच्या भव्य प्रांगणात एनसीसी ५२  बटालीयन द्वारा कॉमन अॅनुअल ट्रेनिंग कॅम्प ता.८ जानेवारी ते १७ जानेवारी या कालावधीमध्ये संपन्न झाला. कॅम्पसाठी ब्रिगेडीअर ओझाजी यांच्या सुचनेनुसार मराठवाड्यातील आठ जिल्हे व जळगाव, अहमदनगर, सोलापूर, धुळे, नंदूरबार अशा १३ जिल्ह्यातील कॅडेटचा सीएटीसी कॅम्प घेण्यात आला. कॅम्पमध्ये ५०९ विद्यार्थी सहभागी झालेले होते. रायफल शुटींग, आपत्ती व्यवस्थापन, शारिरीक सक्षमता, सामाजीक, सामुदायिक व सांस्कृतीक विकासाचे प्रशिक्षण देऊन सहभागी कॅडेटस्मध्ये अविरत राष्ट्रभक्ती व देशसेवेचा निर्धार रुजविण्यात आला.


आदिवासी, ग्रामीण, डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना एन.सी.सी. प्रती माहिती व प्रेरणा मिळावी या हेतूने कमांडिंग ऑफीसर कर्नल एम. रंगाराव यांनी सदर ठिकाणाची निवड केली. दहा दिवस चाललेल्या या शिबीरात सकाळी ६ वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांच्या विविध अॅक्टीव्हिटीमध्ये फायरिंग, मॅप रिडींग, ड्रिल बॅटल क्राफ्ट, नॅशनल इंटिग्रेशन, जजिंग डिस्टन्स इ. सैनिकी प्रशिक्षण देण्यात आले. तसेच साहसी प्रात्यक्षिक स्पर्धा, खेळाच्या स्पर्धासह विविध शैक्षणीक व सांस्कृतीक प्रतियोगिता सुध्दा घेण्यात आल्या.


५२ महाराष्ट्र बटालियन नांदेडचे कमांडिंग ऑफीसर कर्नल एम. रंगाराव व ऍडमिनिस्ट्रेटीव्ह ऑफीसर लेफ्टनंट कर्नल के. दिलीप रेड्डी असे एन.सी.सी. चे दोन वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख निघराणीमध्ये १९ पी.आय. स्टाफने शिबीरार्थीना प्रशिक्षण दिले.


 शिबीराच्या समारोपीय कार्यक्रमात किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी सहभागी सर्व शिबीरार्थीना सदैव देशप्रेम व राष्ट्रभक्तीची भावना तेवत ठेवण्याचे आवाहन करुन एन.सी.सी. च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. समारोपीय कार्यक्रमामध्ये डॉ. प्रदीप चिन्नावार, अभि. निकीता चिन्नावार, विस्तार अधिकारी अनिल महामुने, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार, अभि. प्रशांत ठमके, प्राचार्या शुभांगी ठमके, शेख हैदर हे मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी सादर करण्यात आलेल्या सांस्कृतीक कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने स्थानिक आदिवासी व बंजारा नृत्य तसेच राजस्थान, हरियाना, पंजाब येथील पारंपारीक कलाविष्कार, महाराष्ट्रातील गोंधळ जागर, कोलानृत्य अशा नाविण्यपूर्ण कला प्रदर्शन करण्यात आले.


उपस्थित पालकांनी, स्थानिक विद्यार्थ्यांनी, शिक्षकवृंद व पत्रकारबांधव सहभागी कलावंताच्या कलाकौशल्याने भारावून गेले. या शिबीराच्या सफलतेमूळे पुढील वर्षी सुध्दा याच ठिकाणी एक प्रशिक्षण घेण्यात येणार असल्याचे कमांडिंग ऑफीसर कर्नल एम. रंगाराव यांनी जाहीर करुन सदर यशस्वीतेसाठी मातोश्री कमलताई ठमके संस्थेचे अध्यक्ष अभि. प्रशांत ठमके व सेक्रेटरी प्राचार्या शुभांगी ठमकेसह सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Pages