समाज घडविण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्वाची - जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 6 January 2024

समाज घडविण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्वाची - जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

नांदेड  दि. 6 :- पत्रकारीतेची जबाबदारी ही मोजता येत नाही. आपण जे काही लिहतो अथवा अभिव्यक्त होतो ते वास्तवाशी कितपत खरे उतरणारे आहे हे स्वत:च तपासून घेतले पाहिजे. आपण ज्या बाजूने लिहितो त्याची दुसरी बाजू अभ्यासून घेतली पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याला अचूक बातमी घडवू शकते. अचूक बातमी समाजात सकारात्मक विश्वासार्हता निर्माण करु शकते. मात्र चुकीच्या आधारावर, माहितीवर केलेली बातमी अथवा भाष्य कुणाच्या आयुष्याला उध्वस्त करु शकते हे आपण समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले.

 

जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय  यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या  स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी, माधवराव पवार, उर्दू दै. आलमी तेहरीकचे संपादक अलताफ अहेमद सानी, उर्दू दै. तहेलका टाईम्सचे संपादक महमद ताहेर सौदागर, दै. गोदातीर समाचारचे संपादक केशव घोणसे पाटील, दै. एकमतचे आवृत्ती प्रमुख चारुदत्त चौधरी, उर्दू दै. नांदेड टाईम्सचे संपादक मुन्‍तजोबोद्यीन मुनिरोद्यीन, उर्दू दै. गोदावरी ऑब्झर्वरचे संपादक महमद अब्दुल मुख्तार आबेद, पत्रकार प्रकाश काबंळे, अहमद करखेलीकर, राम तरटे आणि नांदेड जिल्ह्यातील मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.

 

समाज घटकातील प्रत्येक घटनेच्या ठिकाणी पत्रकार सर्वात अगोदर पोहोचतो. आहे त्या परिस्थितीत आपली जबाबदारी पार पाडतो. नागरिकांच्या अडी-अडचणी समजून घेतो. समाजाचे प्रश्न, अडचणी, समस्या शासन-प्रशासनापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी पत्रकार प्रभावीपणे करीत असतात. ही जबाबदारी पार पाडतांना पत्रकारांनी सकारात्मक समन्वय साधण्यावर अधिक भर दिला पाहिजे, अशी अपेक्षा जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी व्यक्त केली.

 

ज्या प्रमाणात विविध माध्यमांची संख्या वाढत आहे त्याच प्रमाणात माध्यम प्रतिनिधींची संख्या वाढत आहे. समाजात माध्यमे वाढणे ही सकारात्मक बाब आहे. ही सकारात्मकता पाहत असताना माध्यम म्हणून, माध्यमांचे प्रतिनिधी म्हणून आपलीही कायद्याच्या दृष्टीने जबाबदारी वाढलेली आहे याचा विसर पडता कामा नये असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले. समाजाला जागे करण्याची भूमिका पत्रकाराची आहे. बातम्यांमुळे कामकाजात सुधारणा होते असे त्यांनी सांगितले.

 

यावेळी अनिकेत कुलकर्णी, अलताफ अहेमद सानी, केशव घोणसे पाटील, प्रकाश कांबळे, महमद अब्दुल मुख्तार आबेद, मुन्‍तजोबोद्यीन मुनिरोद्यीन, अहमद करखेलीकर यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी केले. सुत्रसंचलन व आभार पत्रकार राम तरटे यांनी मानले. पोलीस स्थापना दिवस सप्ताहाच्या निमित्ताने यावेळी आपल्या कलात्मक सादरीकरणातून समाजात चेतना व प्रेरणा निर्माण करणाऱ्या पोलीस बॅड पथकाचा यावेळी सन्मान करण्यात आला. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या मराठवाडा मुक्तिसंग्राम एक आकलन हे पुस्तक व स्मृतिसंदर्भिका उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकारांना देण्यात आले. यावेळी दै. गोदातीर समाचारच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Pages