किनवट : लोकसभा निवडणुकीमध्ये आचार संहितेचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध सीव्हिजील अॅपवर तातडीने तक्रार करता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे तक्रार केल्यानंतर तातडीने प्रतिसाद मिळणार असून तक्रारकर्त्याचे नावही गोपनीय ठेवण्यात येणार आहे.
देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार, नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजील सिटिझन अॅप विकसित केले आहे. या अॅपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कारवाई केली जात आहे. आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करू नये, याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, अनेकदा या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वपिक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार
किंवा माहिती निवडणूक आयोग आणि
जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी निवडणूक आयोगाने सीव्हिजील अॅप विकसित केले आहे. तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते. हा सीव्हिजील अॅप अॅण्ड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी वापरकर्त्यांनी फक्त अॅप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचा तपशील, स्थान, वेळ , आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. अॅप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे. सीव्हिजील अॅप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो. या अॅपच्या अचूकतेसाठी अॅपमधून फक्त लाइव्ह लोकेशनवर आधारित फोटो, व्हिडिओ घेतले जातात. जेणेकरून भरारी पथक, स्थिर संनिरीक्षण पथकांना वेळेत कारवाई करणे शक्य होईल. या अॅपवर तक्रार दाखल होताच निवडणूक आयोग तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कारवाई करेल. या अॅपवरील डाटा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एण्ड टू एण्ड इनक्रिप्टेड ठेवला जातो. अॅण्ड्रॉईड मोबाइलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील अॅप स्टोर या अॅपमध्ये जाऊन सीव्हिजील (CVIGIL) सर्च करावे. त्यानंतर अॅप डाऊनलोड करा. त्यानंतर अॅप उघडून मोबाईल क्रमांक, पत्ता, मतदारसंघ समाविष्ट करून खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे. ते निवडा आणि स्थळ, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओंसह घटनेचातपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा.
No comments:
Post a Comment