किनवट येथे ईद-उल-फित्र उत्साहात साजरी जगाच्या शांततेसाठी अल्लाहला साकडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 12 April 2024

किनवट येथे ईद-उल-फित्र उत्साहात साजरी जगाच्या शांततेसाठी अल्लाहला साकडे


 किनवट  : मुस्लीम बांधवांचा पवित्र सण ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद किनवट शहरात आज गुरूवारी (दि.11) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी साडे नऊ वाजता गोकुंदा येथील ईदगाह मैदानावर शहरातील सर्व मुस्लीम बांधव एकत्र येऊन सामूहिक नमाज-ए-ईद अदा केल्या गेली. नमाज झाल्यानंतर हिंदू बांधवासह सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेऊन ‘ईद मुबारक’ म्हणत ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.


       रमजान ईद या सणाला मुस्लीम समाजामध्ये विशेष महत्व असून, गरीब असो की श्रीमंत सर्वचजण मोठ्या उत्साहात साजरा करतात. गेल्या महिन्याभरापासून मुस्लीम बांधवांनी रोजा अर्थात उपवास धरले होते. सायंकाळी मस्जिद अथवा घरी, दुकानी जिथे कुठे असतील तिथे ठरलेल्या वेळेत उपवास सोडल्या जात होते. गेल्या महिनाभर हिंदु बांधवानी आपल्या मुस्लिम बांधवांसाठी ईफ्तार पार्ट्यांचे आयोजन केले होते.  बुधवारी रात्री चंद्रदर्शन झाल्याने सर्वत्र गुरूवारी(दि.11) ईद साजरी करण्यात आली. आज रमजान निमित्त सर्वांनी नवीन वस्त्रे परिधान करून सकाळी गोकुंदास्थित ईदगाह मैदानावर  सामूहिक नमाज अदा करण्यासाठी एकत्रित जमले. साडेनऊ वाजता जामा मस्जिदचे इमाम मौलाना मुफ्ती सिद्दीकी या धर्मगुरूंनी नमाज पठण करून ईदची बयान व दुआ केली. संबंध जगामध्ये सुख, शांती, समाधान व समृद्धी नांदावी, पुनरपी सामाजिक सलोखा व बंधुभाव निर्माण व्हावा, पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर होऊन चांगल्या पावसामुळे शेती भरघोस पिकावी यासाठी अल्लाहकडे दुआ मागण्यात आली. नमाज पार पडल्यानंतर तिथे जमलेल्या हिंदू बांधवासह सर्व मुस्लीम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.


याप्रसंगी माजी आमदार प्रदीप नाईक,रा.काँ.चे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड, माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार  व के.मूर्ती, बाजार समितीचे उपसभापती राहुल नाईक,रा.काँ.चे युवानेते बालाजी बामणे, गोकुंद्याचे माजी सरपंच प्रवीण म्याकलवार,माजी उपसरपंच शेख सलीम, कंत्राटदार युसूफखान, पत्रकार शकील बडगुजर,हाजी हबीब चव्हाण, मलिक चव्हाण, माजी नगरसेवक जहीरोद्दीनखान, इम्रानखान इसाखान, फिरोज तंवर आदींसह अनेक प्रतिष्ठित व्यापारी व नागरिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती. ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पो.नि. सुनिल बिर्ला यांनी आपल्या सर्व ताफ्यासह शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता.


शिरखुर्म्याने जोपासला बंधुभाव


रमजान ईद म्हटले की,दूध,शेवया व सुकामेव्या पासून बनविलेल्या शिरखुर्म्याची लज्जत आलीच. शनिवारी शहरभरात मुस्लीम बांधवांनी आपल्या गैर मुस्लीम मित्रांसह आप्तेष्टांना घरी बोलावून शिरखुर्म्याचा पाहुणचार केला. या शिरखुर्म्याने परंपरागत चाललेल्या बंधुभाव जोपासण्याच्या प्रथेला झळाळी मिळत असलेली दिसली.

No comments:

Post a Comment

Pages