वणव्यास प्रतिबंध करण्यासाठी वनविभाग सज्ज वनसंपदेला आग लावल्यास आता दंडासह कारावास - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 10 April 2024

वणव्यास प्रतिबंध करण्यासाठी वनविभाग सज्ज वनसंपदेला आग लावल्यास आता दंडासह कारावास

किनवट  : गत काही दिवसांत तालुक्यातील मांडवी परिमंडळातील टेंभी, सारखणी व निराळा तर किनवट वनक्षेत्रातील लोणी व कनकवाडी येथे  वणवा पेटल्याच्या घटना घडल्या आहेत. कधी नैसर्गिक कारणामुळे तर कधी मानवी चुकांमुळे वनात आग लागून वणवा भडकतो. मात्र, नैसर्गिकरीत्या जंगलाला लागणाऱ्या आगीचे प्रमाण केवळ 15  टक्के असून, जंगलांना वणवे लागण्यास मानवनिर्मित कारणांचे प्रमाण 85 टक्के आहे. अशा  वन वणव्याच्या घटना टाळता याव्यात यासाठी किनवट वनविभाग सज्ज झाला असून, वनसंपदेचे नुकसान करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक व फौजदारी कारवाई होऊ शकते, अशी माहिती येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद राठोड यांनी दिली.


वणवा लागण्याच्या प्रमुख कारणांमध्ये मोहफूल सहजपणे वेचता यावे म्हणून त्या झाडाखालील पालापाचोळा, गवत नष्ट करण्यासाठी वेचणाऱ्यांकडून तिथे आग लावली जाते. ती आग पसरून जंगलात वणवा पेटतो.दुसरे कारण म्हणजे,जंगलातील गवत जाळल्याने तेंदूपत्त्याच्या झाडाला फुटवा चांगला येतो, असा लोकसमज आहे. त्यातून अनेक वेळा वणवे भडकविले जातात. तसेच जंगलालगतच्या  शेतकऱ्यांकडून शेताचा बांधा  साफ करण्यासाठी तेथील गवताला आग लावतात. ती आटोक्यात राहिली नाही तर ती आग पसरत जंगलाच्या दिशेने जाऊन वणवा भडकतो. विडी, सिगारेट, आगकाडीचे थोटूक न विझवता तसेच फेकतात. मध गोळा करणारे टेंभे घेऊन जातात आणि काम झाल्यावर तसेच फेकतात, यामुळेही आगीच्या घटना घडतात.


     या  शिवाय जंगलात फिरणारे गुराखी व इतर लोक वनात बिडी,सिगारेट ओढून त्याची जळकी थोटके इतरत्र न विझवता फेकतात, मध गोळा करणारे टेंभे घेऊन जातात आणि काम झाल्यावर तसेच फेकतात. तसेच वनात स्वयंपाकासाठी अथवा शेकोटीसाठी विस्तव पेटवून ती तशीच जळत ठेवणे इत्यादी प्रकार हे कायद्याने गुन्हा असून, त्यातील व्यक्ती शिक्षेस पात्र आहेत. तरीसुद्धा हे प्रकार सर्रास होतांना दिसतात. किनवट वनक्षेत्रात पट्टेदार वाघ, बिबट, रोही, अस्वल, रानडुक्कर, हरणे आदी अनेक वन्यप्राणी असून, आगीमुळे हे सैरभर होऊन अन्न  पाण्याच्या शोधार्थ हे प्राणी जंगलकाठच्या परिसरात तर कधी शेतशिवारात पोहोचतात. वारंवार लागणाऱ्या वणव्यामुळे मानव जातीच्या अस्तित्वासाठी लागणारे पाणी, प्राणवायू तसेच वनस्पती, औषधी, लहान मोठे जीवजंतू, पक्षी, प्राणी आणि त्यांच्या परिसंस्था अशी ही सृष्टिची जैविक विविधताच धोक्यात येत असते.


 मात्र, यंदा वनविभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्या सतर्कतेमुळे वणवा लावण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते. मागील पाच वर्षांत ज्या परिसरात सर्वाधिक आगीच्या घटना घडल्या त्या भागावर वनविभागाची करडी नजर असून, वनविभागातील कर्मचारी गावपातळीवर वन समित्यांच्या सहकार्याने जंगल परिसरातील आग ‘फायर ब्लोअर’ मशीनद्वारे वनसंपदा वाचविण्यात यशस्वी होत आहेत. तसेच वणवा लागल्यास तो आणखी पसरू नये यासाठी ठिकठिकाणी फायर लाईन (जाळ रेषा) तयार केल्या जात आहेत.


    वनात आग लावणे हे भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26(1) (सी) अन्वये तसेच वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 च्या विविध उपबंधान्वये निषिद्ध आहे. याउप्परही जाणीवपूर्वक अथवा नजरचुकीने एखाद्या व्यक्तीने वणवा लावून जंगल नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास दोषी व्यक्तीला दोन वर्षाचा कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा देण्याची कायद्यात तरतूद केलेली आहे. तसेच जर कोणी जंगलास आग लावणाऱ्यांचे नाव व पुरावे वनविभागास दिले तर अशा नाव कळवणाऱ्यास वनविभागाकडून योग्य बक्षीस दिले जाते व त्याचे नावही गुपीत ठेवले जाते. त्यामुळे जंगलात आग लावण्याच्या घटना कमी होतील, अशी आशा आहे.


“ एखाद्या जंगल परिसरात आग लागल्यावर ‘फायर ब्लोअर’ मशीनच्या साहाय्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातात. किनवट वनविभागाकडे सध्या आठ फायर ब्लोअर मशीन असून, ती सर्व सुस्थितीत असल्यामुळे आग लवकर आटोक्यात आणण्यासाठी त्यांची मदत होते. महाराष्ट वन (वनांचे आगीपासून संरक्षण) नियम 1982 मधील नियम 3 नुसार वनहद्दीपासून 1 कि.मी.च्या आत आग प्रज्वलीत करावयाची असल्यास त्याकरिता वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या लेखी परवानगीची आवश्यकता असते.”


प्रमोद राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.), किनवट.

No comments:

Post a Comment

Pages