किनवट शहर व परिसरात चोऱ्या,वाटमारीच्या घटनांमध्ये वाढ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 10 April 2024

किनवट शहर व परिसरात चोऱ्या,वाटमारीच्या घटनांमध्ये वाढ

  किनवट (प्रतिनिधी) : येथील पोलीस ठाण्यातंर्गत अवैध धंदे वाढले असताना आता चोऱ्या,वाटमारीच्या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.                                     


          किनवट शहर तसेच तालुक्यातील कुलूपबंद घरांना चोरटे लक्ष्य करीत असताना चोरट्यांचा मोर्चा आता शासकीय कार्यालयांकडेही वळला आहे. चोरट्यांनी आठवडाभरापूर्वी रात्रीच्या वेळी किनवट शहराच्या साईनगरातील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेचे कुलूप फोडले.  शाळेतील वेगवेगळ्या दोन खोल्यात असलेले वन प्लस एलईडी टीव्ही संच, प्रोजेक्टर, प्रिंटर, बॅटरी, इनव्हर्टर तसेच साउंड बॉक्स असा जवळपास 70 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याच शाळेत यापूर्वीही चोरीच्या घटना घडल्या आहेत. कांही दिवसांपूर्वीच चोरट्यांनी किनवटचे माजी नगराध्यक्ष साजीद खान निसार खान यांचे कुलूपबंद घर फोडून त्यांच्या पिस्तुलसह रोकड व दागिने लंपास केले होते. याप्रकरणाचा अद्याप छडा लागला नसताना, चोरट्यांनी हमरस्त्यावरील शाळेला लक्ष्य केले आहे. शाळेतील चोरीप्रकरणी मुख्याध्यापक अनिलकुमार येरेकार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला. एकीकडे चोरी, घरफोडींच्या घटनेत वाढ होत असताना, दुसरीकडे वाटमारीही सुरू आहे. किनवट - माहूर रस्त्यावरील लोणी पुलाजवळच्या सार्वजनिक रस्त्यावर शुक्रवारी दि.05 च्या सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान अज्ञात तिघा भामट्यांनी पीन केअर मायक्रो फायनान्स कंपनीचे फायनान्स ऑफिसर अनिल भाऊराव राठोड यांची दुचाकी अडविली.  लाथ मारून दुचाकी पाडल्यानंतर त्या तिघांनी राठोड यांना मारहाण करीत त्यांच्याजवळ फायनान्स कंपनीची वसूल केलेली 68 हजार रुपयांची रोकड घेवून पोबारा केला. याप्रकरणी अनिल राठोड रा.बेंदी तांडा,ता. किनवट यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. किनवटलगतच्या गोकुंद्यातही यापूर्वी अशाच पद्धतीने फायनान्स कर्मचाऱ्यांना अडवून चोरट्यांनी रक्कम हडप केल्याचे गुन्हे पोलिसांत दाखल आहेत.

No comments:

Post a Comment

Pages