चिपळूण (संदेश पवार ): दलित पॅंथरचे सहसंस्थापक आणि आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, जेष्ठ साहित्यिक ज. वि. पवार यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक कर्तृत्वावर दिनांक 25 मे 2024 रोजी जागतिक मोहर उमटविण्यात आली आहे. नॉर्थ अमेरिकेतील "आंबेडकराईट असोसिएशन " या संस्थेचा 2024 सालचा विशेष पुरस्कार भारतातील सुप्रसिद्ध लेखक ज. वि. पवार यांना त्यांच्या अनुपस्थितीत देण्यात आला .
आंबेडकराईट असोसिएशन ऑफ नोर्थ अमेरिका (AANA ) ही संस्था दरवर्षी सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या एका व्यक्तीस डॉ. आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मानित करीत असते. यावर्षी ज. वि. पवार यांनी उद्दीपित केलेल्या चळवळीचा, त्यांनी लिहिलेल्या ग्रंथसंपदेचा तसेच समाज उन्नयनासाठी दिलेल्या जगभरातील व्याख्यानांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार देण्यात आला आहे . हा पुरस्कार म्हणजे पवार यांनी प्रगल्भित केलेल्या आंबेडकरवादाचा सन्मान आहे. ज.वी. पवार यांनी आंबेडकरवादाची कधीही कास सोडली नाही. उभे आयुष्य त्यांनी केवळ आंबेडकरवादाची जपणूक केली आहे .
ज . वी. पवार यांची ग्रंथसंपदा मराठी, हिंदी, इंग्रजी व भारतातील अनेक प्रादेशिक भाषेत प्रसिद्ध झाली असून अनेक विद्यापीठातील अभ्यासक त्यांच्या चळवळीवर व साहित्यावर प्रबंध लिहीत आहेत. त्यांच्या कवितांचा आणि ग्रंथांचा समावेश अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेला आहे. आजही ते सतत क्रियाशील असून आंबेडकरवादी चळवळीत अत्यंत सक्रिय आहेत. त्यांच्याच आशीर्वादाने अपरांत साहित्य कला प्रबोधिनी या साहित्य विषयक संस्थेचा उदय झालेला आहे. त्यांना मिळालेल्या या जागतिक पुरस्काराबद्दल आंबेडकरी चळवळीतून तसेच समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

No comments:
Post a Comment