‘रोहयो' अंतर्गत 580 कामावर 06 हजार 982 मजूर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 12 June 2024

‘रोहयो' अंतर्गत 580 कामावर 06 हजार 982 मजूर

किनवट (प्रतिनिधी) : पंचायत समितीच्या ‘रोहयो’ विभागांतर्गत तालुक्यातील एकूण 134 ग्रामपंचायतीपैकी 96 ग्रा.पं.अंतर्गत विविध प्रकारची 580 कामे सुरू असून, त्या कामावर 6 हजार 982 मजूर काम करीत असल्याची माहिती गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव यांनी दिली.


तालुक्यात खरीप हंगामातील शेतीची कामे सुरू असून, उन्हाळ्यात शेजारच्या तेलंगणात मजुरीसाठी स्थलांतरित झालेली कुटुंबे आपल्या गावी परतत आहेत. इतर ठिकाणी काम नसतांना ग्रामीण भागातील शेतमजुरांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा फार मोठा आधार वाटतो. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत कामांसाठी मजुरांना नाव नोंदणी करून जॉबकार्ड घेणे अनिवार्य आहे. नाव नोंदणी केलेल्या मजुरांना 100 दिवसांचा हक्काचा रोजगार दिला जातो. योजनेचे संपूर्ण कामकाज हे संगणकीकृत असून लाभार्थी यांच्या बँक खात्यात त्यांच्या मजुरीची रक्कम जमा होत असते.  


         तालुक्यातील सध्याची परिस्थिती व विविध योजना मार्गी लावण्यासाठी पं.स.रोहयो विभागाकडून 96 ग्रामपंचायती अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक कामामध्ये पांदण रस्ते, सिंचन विहीरी, शेततळे, रोपवाटिका, फळबाग,पेवरब्लॉक,घरकुल,संरक्षक भिंत, वृक्षलागवड आदी प्रस्तावित कामांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार  तालुक्यात सिंचन विहिरीची 456 कामे चालू आहेत. तसेच वैयक्तिक लाभाच्या कामांमध्ये फळबाग लागवडीचे एक काम, पशुधनासाठी गोठा बांधण्याची 05 कामे, शेततळे खोदण्याची 02 कामे आणि घरकुल बांधण्याची 59 अशी एकूण 67 कामे चालू आहेत. सार्वजनिक स्वरूपाच्या कामांमध्ये पांदण रस्त्याची 25 कामे, सिमेंट रस्त्याची 24 कामे, शाळेची संरक्षक भिंतीची 02 कामे, पेव्हर ब्लॉक बसविण्याची 05 कामे तर वृक्षलागवडीचे एक काम मिळून एकूण 57 कामे चालू आहेत. या प्रमाणे सिंचनविहीरी 456 , वैयक्तिक लाभाची 67 आणि सार्वजनिक कामे 57 मिळून तालुक्यातील 96 ग्रा.पं. अंतर्गत 580 कामे चालू असून, त्यावर एकूण 06 हजार 982 मजूर राबत आहेत.



ग्रामीण भागात शेती निगडीत कामे संपल्यावर रोजगार हमीच्या कामांकडे मजुरांचा कल असतो. मात्र, पूर्वी प्रति दिवस मजुरी केवळ 273 रुपये मिळत असल्याने अनेक मजुरांनी याकडे पाठ फिरवली होती. ही बाब लक्षात घेऊन यावर्षी केंद्र सरकारने अध्यादेश काढून मजुरांना देण्यात येणाऱ्या अकुशल मजुरीमध्ये आठ टक्क्यांनी वाढ केली असून, आता ‘रोहयो’च्या मजुरांना 297 रुपये प्रतिदिन मजुरी मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

Pages