छावणी गौरव ग्रंथ :सहा दशकाचा दस्त ऐवज -राजू गोपीनाथ रोटे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 23 June 2024

छावणी गौरव ग्रंथ :सहा दशकाचा दस्त ऐवज -राजू गोपीनाथ रोटे गौरव ग्रंथ निर्मितीच्या मागे ठोस असे काही हेतू असतात. ज्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करण्यात आलेला आहे त्या व्यक्तिचे व्यक्तिमत्व व्यापक दृष्टिकोनातून वाचकांसमोर आणणे  त्यांच्या कार्याचे समायोजन, विश्लेषण  व्यापक स्वरूपात  वाचका समोर मांडणे हे अभिप्रेत असते." छावणी "गौरव ग्रंथ वाचताना ग्रंथाचा हेतू  साध्य झाला आहे असे आपणास म्हणता येईल.


 छावणी हा गौरव ग्रंथ आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साहित्यिक अर्जुन डांगळे यांच्या संदर्भात आहे. 

अर्जुन डांगळे यांनी आता  वयाची अंशी पार केली आहे तरी त्यांचा जोम उत्साह तसाच कायम आहे.त्यांचा वावर हा  साहित्य,  राजकारण आणि संस्कृती या वर्तुळात प्रभावीपणे राहिला आहे.त्यांना समजून घेणे म्हणावे तेवढे सोपे नाही. त्यासाठी भारतीय राजकारण, इथली जाती व्यवस्था, धर्म व्यवस्थे सोबत अस्तित्वात असलेली वर्ग व्यवस्था याचा अभ्यास असणे गरजेचे आहे.

व्यक्तिमत्व विकशीत होण्याची एक प्रक्रिया असते.व्यक्तीचे जगणे व्यक्तीची विचारधारा आणि व्यक्तीला आलेले अनुभव या प्रक्रियाचा अभ्यास करून त्याची मांडणी काही टप्प्यात करता येते.

गौरव ग्रंथाची विभागणी करताना प्रकाशकाने  कल्पकतेने विविध भाग निर्माण करून  डांगळे साहेबांचे व्यक्तिमत्व उभे करण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रथमदर्शी अर्जुन डांगळे यांची ओळख ही जेष्ठ दलित साहित्यिक अशी आहे.त्यांनी  लिहिलेल्या ग्रंथाच्या नावाची  यादी जरी  करायची म्हटलं तर त्याला दोन पानं लागतात.या सर्व साहित्याचा आढावा पहिल्या भागात विविध मान्यवर साहित्यिकांच्या माध्यमातून   घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

अर्जुन डांगळे साहेबांचे सारे साहित्य फुले शाहू आंबेडकरी विचार धारेतले असून त्यातून स्वातंत्र्य समता बंधुत्व हे मूल्य आपणास  सतत भेटत राहतात. बुद्धाच्या विचारातील शील प्रज्ञा करुणा मांडताना वर्ग कलह आणि कामगार वर्गाचे दुःख मांडण्याचा त्याचा प्रयत्न महत्वाचा आहे. बुद्ध आणि मार्क्स यांच्या समता प्रस्थापित करणाच्या साधनांमध्ये फरक असला तरी समता हे मूल्य दोघांच्याही विचारच्या केंद्र स्थानी आहे.दोघांमधील समतेचा समान धागा डांगळे साहेब आपल्या साहित्यात मांडतात.त्यांच्या साहित्याचे विश्लेषण आणि चिंतन मंथन करताना अभ्यासू साहित्यिक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, डॉक्टर संजय मून,डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले, डॉक्टर रावसाहेब कसबे किशोर मेढे, डॉक्टर भास्कर पाटील, इत्यादी प्रस्थापित साहित्यिकांनी आपले विचार पहिल्या भागात मांडले आहेत.


दुसऱ्या भागात अर्जुन डांगळे हे व्यक्तिमत्व नेमकं काय आहे हे त्यांच्या विविध सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या समोर मांडण्यात आलेले आहे. तस पाहिलं तर हे आत्मचरित्र नाही मात्र विविध क्षेत्रातील मित्र परिवार यांच्या अनुभवातून अर्जुन डांगळे यांचं व्यक्तिमत्व आपल्या समोर उभे राहते.


 राजकीय चळवळीतील भेटलेलें त्यांचे सहकारी तसेच प्रस्थापित नेते  यांच्या माध्यमातून अर्जुन डांगळे कसे जगले आणि त्यांचे राजकीय विचार काय आहेत हे मांडण्याचा प्रयत्न प्रकाशकाने कल्पकतेने केला आहे. यात रामदास आठवले, नीलम गोरे,सुभाष देसाई,  दिवाकर शेजवळ, मधु मोहिते, इत्यादी साहित्यिक विचारवंत लेखाच्या माध्यमातून आपल्याशी डांगळे साहेबा बद्दल बोलतात.

  या ग्रंथात अर्जुन डांगळे आणि चळवळ हा तिसरा भाग असून यामधील चळवळीतील  प्रस्थापित नेते आणि कार्यकर्ते यांचे लेख आहेत.यात प्रामुख्याने अविनाश म्हातेकर, राही भिडे, दिलीप जगताप, उत्तम कांबळे इत्यादी चळवळीची परिपक्व जाणीवा असलेल्या आणि समाजाचे नेतृत्व करणाऱ्या प्रस्थापित विचारवंताची लेख आहेत.

  अर्जुन डांगळे संवाद यामध्ये या ग्रंथाचे संपादक डॉ.महेंद्र भवरे  अर्जुन डांगळे यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली आहे  त्यांनी त्यांच्या जीवन संघर्षाबद्दल माहिती दिली आहे.

 

 डांगळे साहेबांचे जीवन म्हणजे अभ्यासाचा विषय आहे. माटुंगा लेबर कॅम्प वस्तीत त्यांचे बालपण गेले. एका बाजूला लाल बावटा हाती घेतलेल्या कामगार वर्गाची  चळवळ समजून घेताना ते दुसऱ्या बाजूला जाती व्यवस्थेच्या विरोधात उभी राहिलेली आंबेडकरी चळवळ पाहत होते.या दोन्ही चळवळीला समजून घेऊन यातील साम्य आणि शक्तिस्थळे समजून घेण्याची संधी डांगळे साहेबांना लाभली.पुढे त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये या गोष्टी आपल्याला प्रकर्षाने जाणवतात.  

"छावणी हलते आहे"  हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह वैशिष्ट्यपूर्ण आहे.छावणी ही लढवय्या सैनिकाचे असते. ती छावणी शांत नाहीये ती हलते आहे.दया पवार काव्यसंग्रहाच्या निमित्ताने  म्हणतात "अर्जुनच्या डोळ्यात मी अनेकदा डोकावलो आहे तशी त्याला सर्व भौतिक सुखी आज मिळतात तरी तो खूप बेचैन आहे ही बैचनी अस्वस्थता आली कुठून? जणू काही त्याच्या डोळ्यातून बॉम्ब फुटणार आहेत.

ही अस्वस्थता बहुतेक जाती आणि वर्ग संघर्ष करणाऱ्या सर्व योद्धा मध्ये असलेली दिसते. तिचे नाते सिद्धार्थच्या मनातील वैचारिक संघर्षाशी असते.

"बांधा वरची माणसं" या कथा संग्रहा बद्दल बोलताना डॉ भालचंद्र फडके म्हणतात.

बाबासाहेबांच्या विचारांबरोबर या कथा लेखकाच्या मनावर गौतम बुद्धाच्या कार्ल मार्क्स फुल्याच्या विचाराचाही संस्कार झालेला आहे. या महापुरुषांच्या विचारात माणसाचे मोठेपण मानलेले सर्वांना समता अधिष्ठित समाज रचना हवी आहे.

हे विधाने अर्जुन डांगळे यांच्या व्यक्तिमत्वाचे परिपक्वतेचे पैलू दर्शवतात.

जाती विषमता वर्गीय विषमता या विरोधात बंड करून मोठा लढा उभारण्याचे कार्य अर्जुन डांगळे यांनी केले आहे. ते "दलित पॅंथर" चे संस्थापक सदस्य असून  प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाचे मजबूत खांब म्हणून राहिले आहेत.नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज वि पवार यांच्याच रांगेत पुढाकार्याने अर्जुन डांगळे यांचे नाव घेतले जाते.तब्बल सहा दशक समाजकारण राजकारणात टिकून राहणे साधी गोष्ट नाही.सर्व पक्षीय लोकांशी सलोख्याचे संबंध ठेवणे ही किमया जमलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या  एकमेव नेते म्हणजे अर्जुन डांगळे आहेत.

 मी डांगळे साहेबांना साधारणता नव्वदच्या दशकामध्ये भेटलो. मीं त्यावेळी पंचवीस वर्षाचा तरुण होतो.सामाजिक संस्थेच्या सोबत काम करता करता मी रिपब्लिकन चळवळीकडे ओढला गेलो होतो. त्यावेळी डांगळे साहेबना मीं पहिल्यांदा भेटलो. डांगळे साहेब मला खूप शांत आणि संयमी वाटलें. इतर दलीत नेत्यामध्ये असलेला आक्रमकपणा दिसला नाही. पुढे जेव्हा त्याचं साहित्य वाचलं  तेव्हा लक्षात आलं वरून शांत वाटणाऱ्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विचारांमध्ये एक प्रचंड असा ज्वालामुखी आहे.

 1997 साली ऐद्यकृत रिपब्लिकन पक्ष निर्माण झाला होता. या पक्षाच्या माध्यमातून महानगरपालिकेची मी निवडणूक लढवली या निवडणुकीत लढवण्यासाठी  मला प्रेरित करणारे डांगळे साहेब होते. त्यांनी मला रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवारी देऊन माझा आत्मविश्वास कमालीचा वाढवला होता. कार्यकर्त्यांची संवाद करणे कार्यकर्त्यांना उभे करणे हे कामही डांगळे साहेबांनी केले पण याचा उल्लेख या गौरव ग्रंथामध्ये कमीच आला.


आंबेडकर चळवळीचे अनेक स्थितांतरे झाली आहेत. ही स्थितांतरे जवळून पहिलेलें अर्जुन डांगळे हे सहा दशकाचे साक्षीदार आहेत.

पँथरची स्थापना, रिपब्लिकन ऐक्य असो कीं रिडोलस रिडल्स प्रकरणातील आंदोलन असो.. वर दिसणाऱ्या घटनाच्या मागे झालेल्या अनेक घटना आहेत त्या घटना आपण्यास डांगळे साहेबच सांगू शकतात.या गौरव ग्रंथात मान्यवरांच्या लेखातून अनेक घटनावर प्रकाश 

 टाकला आहे.

 

या गौरव ग्रंथामध्ये पत्र संवाद छायाचित्रे  समाविष्ट केल्यामुळे हा ग्रंथ एक परिपूर्ण ग्रंथ झाला असल्याचे आपणास जाणवते. एकूणच 542 पानाचा हा गौरव ग्रंथ  विचार मंथन करण्यास योग्य आहे. हा ग्रंथ जरी अर्जुन डांगळे यांच्या जीवन गौरव बद्दल बोलत असला तरी या सगळ्या अनुषंगाने आपल्यासमोर अनेक गोष्टी उभ्या राहतात. काही प्रमाणात  आंबेडकर हयात असताना तसेच आंबेडकरोत्तर चळवळ आपल्या समोर उभी राहते.हा ग्रंथ आपल्या संग्रही असायला हवा.

@राजू गोपीनाथ रोटे 

rjrt1971@gmail.com

8454078073

No comments:

Post a Comment

Pages