निकृष्ट दर्जामुळे नवीन बांधलेला पूल कोसळला - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 23 June 2024

निकृष्ट दर्जामुळे नवीन बांधलेला पूल कोसळला

किनवट (प्रतिनिधी) : रस्ते विकास कामांच्या माध्यमातून तालुक्याचा विकास करण्यावर भर देण्यात आला होता; मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोठारी ते पार्डी बोधडी जाणाऱ्या मार्गावरील शनिवारपेठ जवळील नव्याने बांधलेला आणि रहदारीसाठी खुला केलेला छोटा पूल नुकताच कोसळला आहे. पूल दिवसा कोसळल्याने वाहनांचा अपघात वा जीवित हानी सुदैवाने टळली. रात्री कोसळला असता दोन-चार अपघात नक्कीच झाले असते, अशी चर्चा आहे.


कोठारी ते पार्डी-बोधडीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर कांही ठिकाणी डांबरीकरण आणि लहान पुलांचे बांधकाम करण्यात आले होते. डांबरीकरणाच्या कामाचा दर्जासुद्धा म्हणावा तसा चांगला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.  काही दिवसापूर्वी किनवट ते मांडवा जाणाऱ्या मार्गावर कमी जाडीचा डांबराचा थर देऊन संबंधित कंत्राटदार थातुरमातुररित्या काम पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतांना, वंजारवाडीतील कांही सामाजिक कार्यकर्ते व सुजान नागरिकांनी  चक्क कामच थांबवल्याने प्रशासनातील संबंधित अभियंत्याला त्याची तात्काळ दखल घ्यावी लागली आणि लगेच दुसऱ्याच दिवशी पुन्हा त्या रस्त्यावर योग्य त्या प्रमाणात पुनश्च डांबरीकरण करून देण्यात आले. यावरून शासनासह लोक प्रतिनिधींच्या मनात कितीही विकसित भारताचे स्वप्न असले, तरी तीच भावना गुत्तेदारांसह संबंधित अभियंत्याच्याही मनात असणे तेवढेच गरजेचे आहे, असे वाटते.


कोठारी-कोपरा-धानोरा हा सुद्धा नांदेडला जाणारा कमी अंतराचा प्रसंगानुरुप पर्यायी मार्ग आहे. मात्र,कोपरा घाटातील कामाचीही अशीच वाताहत झाली आहे. घाटातील काम कधी पूर्ण होणार यावर खूप कांही अवलंबून आहे. शनिवारपेठ गावाजवळ नवीन पूल बांधण्यात येऊन मागच्या आठवड्यात दळणवळणासाठी रस्ता खुला केला होता. मात्र चार-सहा दिवसातच पुलाचे छत कोसळले. बांधकाम विभागाने याही कंत्राटदाराची कान उघडणी केल्यामुळे कंत्राटदाराने सावरासावर करीत छत टाकल्याचे समजते. दर्जेदार मार्गासाठी लोकप्रतिनिधीही लक्ष देऊन तंबी दिल्यास काही फरक पडून रस्ते चांगले होण्याची शक्यता आहे, असे वाटते.

No comments:

Post a Comment

Pages