शेतकर्‍यांनी पुरेसा पाऊस झाल्यशिवाय खरीप पेरणीची घाई करू नये- किनवट तालुका कृषी विभागाचे आवाहन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 15 June 2024

शेतकर्‍यांनी पुरेसा पाऊस झाल्यशिवाय खरीप पेरणीची घाई करू नये- किनवट तालुका कृषी विभागाचे आवाहन

किनवट  (प्रतिनीधी) : गेल्या अनेक वर्षांपासून कृषी विभागातर्फे वारंवार सूचना देऊनही शेतकरी हे घाईगडबडीने पेरणी करत आहेत. मात्र, बर्‍याच वेळा पावसाने अचानक दडी मारल्यामुळे शेतकर्‍यांना याचा मोठा फटका बसून, दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे जमिनीत किमान सात इंच खोलीपर्यंत ओलावा आणि शंभर मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असं आवाहन किनवट तालुका कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.


      नांदेड जिल्ह्यात सर्वत्र कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडत असून, किनवट तालुक्यात मात्र आजपर्यंत  सरासरी केवळ 23.30 मि.मी. पाऊस पडलेला आहे. या अनुषंगाने   तालुक्यातील शेतकर्‍यांचे अकारण नुकसान होऊ नये म्हणून कृषी विभागातर्फे काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात कृषी निविष्ठाचे दर काही प्रमाणात वाढल्यामुळे यांचा  योग्य व काटकसरीने आणि शिफारशीनुसार पिकाच्या वाढीच्या अवस्थेत वापर करावा. सर्व निविष्ठा खरेदीच्या पावत्या फाईलमध्ये जपून ठेवाव्यात. आपल्या जमिनीच्या प्रतनुसार आणि उपलब्ध सिंचन व्यवस्थेनुसारच पिकांच्या वाणाची निवड करावी. तसेच  अगोदर ज्या शेतकर्‍यांनी माती व पाणी परीक्षण केले आहे, त्यांनी त्याप्रमाणे खत व अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करावे. साधारणत: 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर आणि जमिनीत योग्य ओलावा येऊन उष्णता कमी झाल्यावरच पेरणीला सुरुवात करावी. पेरणी करण्याअगोदर केंद्रीय संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे ,कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग यांनी शिफारस केलेल्या रासायनिक व जैविक औषधांची बीजप्रक्रिया केल्यानंतरच पेरणी करावी. तसेच सोयाबीनच्या बियाणास बीजप्रक्रिया करण्यासाठी कार्बक्झीन 37.5 टक्के + थायरम 37.5 टक्के ( व्हीटावॅक्स पॉवर) ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे सोबत थायोमिथोक्झाम 30 टक्के  (क्रुझर) ३ मिली या प्रमाणे प्रतिकिलो बियाणास बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. पिकाच्या विशिष्ट एका वाणाची किंवा एकाच प्रकारची खते न मागता  मिश्र खतांना प्राधान्य द्यावे. शक्यतो घरचे बियाणे शुध्द, चांगले आणि उगवण क्षमता उत्तम असेल तर  बीज प्रक्रिया करून ते वापरावेत. तसेच  पेरणी करण्यापूर्वी खरेदी केलेल्या बियाण्यांपैकी थोडेसे बियाणे पोत्यामध्ये  टॅगसहित ठेवावेत. जेणेकरून उगवण क्षमता  कमी आल्यास तक्रार करून आपल्याला न्याय मागता येईल.


        सध्या मान्सूनचे आगमन महाराष्ट्रात झाले असून भारतीय हवामान वेधशाळेच्या अंदाजानुसार येत्या दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. . त्या दरम्यान शक्यतो दूरवरचा प्रवास टाळावा. आकाशामध्ये ढगांचा गडगडाट व विजेचा कडकडाट होतांना शेतातील कामे सोडून पक्क्या घराचा आश्रय घ्यावा. कोणीही झाडाखाली थांबू नये आणि आपल्या घरातील सर्व विद्युत उपकरणे बंद करावीत, असे आवाहनही कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.


 “ शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 मध्ये पिकाच्या लागवडीपासून काढणीपर्यंत काही शंका असल्यास ऑडिओ किंवा व्हिडिओकॉलद्वारे आपल्या सर्कलमधील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी  यांच्यांशी मार्गदर्शनासाठी संपर्क साधावा व आपले पुढील होणारे संभाव्य नुकसान टाळावे. तसेच आपल्या पिकाचे फोटो व्हॉट्सअ‍ॅप व इतर सामाजिक माध्यमाद्वारे आम्हाला सादर करावेत. जेणेकरून पिकाची वाढीची अवस्था कीड व रोगांचे आक्रमण यांच्या प्रमाणानुसार व तीव्रतेनुसार आपल्याला योग्य त्या औषधांची शिफारस करण्यात येईल .शक्यतो रोग आणि कीड आल्यानंतर फवारणी करण्यापेक्षा अगोदरच काळजी घेतलेली बरी.”


 -बालाजी मुंडे. तालुका कृषी अधिकारी, किनवट.

No comments:

Post a Comment

Pages