किनवट तालुक्यातील दोन मंडळात दमदार तर इतर मंडळात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 19 June 2024

किनवट तालुक्यातील दोन मंडळात दमदार तर इतर मंडळात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस

किनवट  (प्रतिनिधी) : तालुक्यातील नऊ मंडळापैकी जलधारा व  उमरीबाजार या दोन मंडळामध्ये सोमवारी रात्री (दि.17) दमदार  पाऊस  झाला तर सिंदगी मोहपूर मंडळात मध्यम आणि किनवट, बोधडी, इस्लापूर, मांडवी, दहेली  या मंडळात  हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसला. शिवणी मंडळात मात्र पाऊस पडला नाही. दरम्यान, मंगळवारी(दि.18) सकाळी आठ पर्यंत संपलेल्या गत 24 तासात संपूर्ण तालुक्यात एकूण 211.20 मि.मी.पाऊस पडला असून, त्याची सरासरी 23.5 मि.मी.आहे.


       मृग नक्षत्र संपण्याच्या बेतात असताना, तालुक्यात पावसाचे आगमन झाले आहे. गत दोन दिवसापासून किनवट तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अधून-मधून पडत आहे. मात्र, जलधारा मंडळ वगळता अजूनही सर्वदूर पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. पेरणीसाठी मोठ्या शेतकऱ्यांना दमदार पावसाची वाट पहावी लागत आहे.  यंदा चांगल्या आणि समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यामुळे, मृगातील पेरा साधण्यासाठी शेतकरी बांधवांनी जमिनीची मशागत करून, महागड्या खताची व बियाण्यांची खरेदी करून ठेवली होती. मात्र, जूनचा पहिला पंधरवडा अक्षरश: कोरडा गेला. अखेर रविवार (दि.16) पासून हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळणे सुरू झाले आहे. मात्र, वातावरणातील उकाडा कायम असून, पाऊस पडतानाच काय तो गारवा तयार होतो.


        मंगळवारी सकाळी घेतलेली किनवट तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे असून, कंसात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय पावसाची नोंद दिलेली आहे.  किनवट- 18.0 (38.8 मि.मी.); बोधडी- 09.0 (40.4 मि.मी.); इस्लापूर- 19.5 (87.4 मि.मी.); जलधरा- 47.3 (125.2 मि.मी.); शिवणी- 00.3 (58.9 मि.मी.); मांडवी- 18.3 (76.6 मि.मी.);  दहेली- 16.0 (34.9 मि.मी.), सिंदगी मो. 29.3 (62.9 मि.मी.); उमरी बाजार 53.5 (88.1 मि.मी.).


       एक जूनपासून तालुक्यातील एकूण नऊ महसूल मंडळात मिळून आजपर्यंतचा पडलेला एकूण पाऊस 613.2 मि.मी.असून, त्याची सरासरी 68.2 मि.मी.आहे.  आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक पाऊस जलधारा मंडळात झाला असून, सर्वात कमी  दहेली मंडळात झालेला आहे. तालुक्यात जून महिन्यातील मंगळवार (दि.18)पर्यंत पडणारा अपेक्षित पाऊस  113.7  मि.मी.असून, त्या तुलनेत सरासरी केवळ 68.2 मि.मी. पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 60.07 असून सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत तब्बल 39.93 टक्के पावसाची तूट आहे.  तालुक्यातील नदी,नाले अजून पूर्णत: वाहते झाले नाहीत. ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी आहेत ; त्यांची लागवडीची लगबग सुरू झाली आहे.

No comments:

Post a Comment

Pages