किनवट (प्रतिनिधी) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, किनवट येथील नूतन रोपवाटिकेमध्ये दुर्मिळ पिवळा पळस आणि चारोळी यांच्या बियांद्वारे रोपं तयार करण्यात आली असून, शनिवारी (दि.15) स्वारातीम विद्यापीठातील विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. माधव पाटील यांच्या हस्ते या रोपवाटिकेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सायन्स महाविद्यालय नांदेड चे वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख प्रो.बी.डी. गचांडे व यशवंत महाविद्यालय नांदेड चे रसायनशास्र विभाग प्रमुख प्रो.व्ही. एन. भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
जगामध्ये पिवळा पळस, वेलीया पळस आणि तांबडा पळस या तीन जाती आढळून येतात. मराठवाड्यातील नांदेड जिल्हातील किनवट व माहूर हे तालुके अमाप अशा वनसमृद्धीने बहरलेले आहेत. एकाच वनस्पतींच्या विविध प्रजाती या जंगलांमध्ये आढळतात. त्यापैकी अनेक औषधी वनस्पती विविध प्रकारच्या आजारावर गुणकारी आहेत. दरवर्षी लागणार वणवा व बेसुमार वृक्षतोडीमुळे या औषधी वनस्पतीची झाडे,वेली लुप्त होत चालली आहेत. त्यामुळेच त्यांचे नीट संगोपन व संवर्धन होणे आवश्यक आहे.
पिवळा पळस ही अत्यंत दुर्मिळ वनस्पती असून, किनवटच्या जंगलात विपुलतेने सापडते. आजमितीला त्याचे जतन करून वाढ करणे ही काळाची गरज आहे हे ओळखूनच तसा संकल्प कुलगुरू डॉ मनोहर चासकर व केंद्र समन्वयक डॉ. श्रीनिवास रेड्डी यांनी केला. तीन महिन्यापूर्वी येथील संशोधन केंद्रात पिवळा पळस व चारोळी यांच्या बिया आणून त्यापासून रोपवाटीकेमध्ये रोपं तयार करण्यात आली. लवकरच वन विभाग, वनस्पती उद्याने, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालये, शाळा,शासकीय कार्यालये व निसर्ग प्रेमी यांना या पिवळा पळसाची माहिती देऊन या रोपांचे नि:शुल्क वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्राचे समन्वयक डॉ. रेड्डी यांनी दिली.
या प्रसंगी सर्व पाहुण्यांचे ही दुर्मिळ रोपं देऊन स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनील व्यवहारे यांनी केले. यावेळी ब.पा.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. बेंबरेकर, सरस्वती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भंडारे, माजी प्राचार्य शिवराम जाधव, प्रा. द्वारकादास वायाळ, प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड, प्रा. बदने मुरारी, कनिष्ठ लिपीक रमेश जकुलवार, सेविका सौ. वर्षा मुकेरवार यांचेसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment