किनवट : तालुक्यात गत जून महिन्यातील 23 तारखेपर्यंत एक-दोन मंडळ वगळता इतर मंडळात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे ,तेव्हापासून खरीप पेरण्यांनी वेग घेतला होता. तालुका कृषी कार्यालयाच्या 18 जुलै च्या अंतिम खरीप पीक पेरणी अहवालानुसार सद्यस्थितीत तालुक्यातीतील 79 हजार 077 हेक्टरवर खरीप पिकाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून, त्याची टक्केवारी 101.38 आहे. यात कापसाचे क्षेत्र सर्वाधिक आहे.
. किनवट तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 1 लाख 56 हजार 753 .68 हेक्टर आहे. यापैकी पूर्वी खरीप हंगामातील लागवडी खालील सर्वसाधारण एकूण क्षेत्र 82 हजार 360.8 हेक्टर होते. 2020 मध्ये ते घटविण्यात येऊन 78 हजार 001 हेक्टर ठरविण्यात आले आहे. यंदा मात्र, यापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.
तालुक्यात यावर्षी तृणधान्यामध्ये भाताचे सर्वसाधारण क्षेत्र 309 हेक्टर आहे. यंदा त्यात वाढ होऊन 330 हेक्टरवर पेरणी झाली असून, त्याची टक्केवारी 106.80 आहे. खरीप ज्वारीचे सर्व सा.क्षेत्र 2 हजार 249 हेक्टर आहे. मात्र,मागील तीन वर्षापासून जोरदार अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे खरीप ज्वारीचा पूर्ण बट्ट्याबोळ झालेला अनुभव पाहता, यंदा खरीप ज्वारीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे यावेळी केवळ 126 हेक्टरवर खरीप ज्वारीची पेरणी झालेली असून, त्याची टक्केवारी केवळ 5.60 आहे. किनवट तालुक्यात बाजरी व राळाचे पीक पूर्वी घेतल्या जात होते. ते आता पूर्णत: बंद झालेले आहे. मका या पिकासाठी सर्व.सा.क्षेत्र 194 हेक्टर आहे. यावर्षी मका पेरणीचे क्षेत्र दुपटीपेक्षा जास्त वाढून 542 हेक्टरवर तो पेरला गेला आहे. त्याची टक्केवारी 279.38 आहे.
कडधान्यामध्ये तुरीसाठीचे सर्वसाधारण क्षेत्र 6 हजार 627 हेक्टर आहे. या हंगामात तूर पेरणीचे प्रमाण वाढले असून, 7 हजार 234 हेक्टरवर तुरीची पेरणी झालेली आहे. मृगनक्षत्रात म्हणावा तसा पाऊस न झाल्यामुळे कमी दिवसात येणारे मूग व उडीद या पिकांचे क्षेत्र घटलेले दिसते. मुगासाठीचे लागवडीखालील क्षेत्र 1 हजार 212 हेक्टर आहे. मात्र यंदा फक्त 422 हेक्टरवर त्याची पेरणी झाली असून, त्याची टक्केवारी 34.82 आहे तर उडदासाठीचे क्षेत्र 01 हजार 119 हेक्टर असून, केवळ 374 हेक्टरवर त्याची पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी 33.42 आहे. गळीत धान्यामध्ये भूईमूग,सूर्यफूल,तीळ व कारळ ही पिके किनवट तालुक्यात खरीपात घेणे पूर्णत: बंद झालेले आहे. तिळासाठी नाममात्र 16 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र होते मात्र, कुणीही तीळ पेरला नाही.
गतवर्षीपेक्षा यंदा सोयाबीनच्या लागवडीत बरीच घट झालेली आहे. तीन-चार वर्षापासून सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन त्याच्या उतारात घट येत आहे. शिवाय दाण्यांची प्रतही खराब होत असल्याचे भाव कमी मिळतो. तसेच सोयाबीनच्या उत्पादन खर्च निघून शेतकऱ्यांच्या हाती काही उरेल एव्हढा भावही बाजारपेठेत व हमीदराद्वारे मिळत नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीनकडे पाठ फिरविली आहे. सोयाबीनचे लागवडी खालील सर्वसाधारण क्षेत्र 17 हजार 032 हेक्टर आहे. गत वर्षी 20 हजार 110 हेक्टरवर पेरा झाला होता. मात्र यंदा त्याचे क्षेत्र घटून केवळ 16 हजार 405 हेक्टरवर त्याचा पेरा झालेला आहे.
कापूस या नगदी पिकाचे सर्व सा.क्षेत्र 48 हजार 072 हेक्टर आहे. गतवर्षीचा अमेरीकन बोंड अळीचा प्रकोप, कापूस फुटल्यावर झालेला अवकाळी पाऊस व विक्रीसाठी झालेले हाल पाहता यंदा त्याचे क्षेत्र थोडेसे कमी होईल असे वाटले होते. मात्र, त्यात वाढ झालेली असून, शेतकऱ्यांनी तब्बल 51 हजार 774 हेक्टरवर कापसाची लागवड केलेली आहे. त्याची टक्केवारी 107.70 आहे.
याशिवाय तालुक्यात ऊसाची लागवड 160 हेक्टर, केळी 33 हेक्टर, हळद 1 हजार 048 हेक्टर, मिरची 15 हेक्टर, अदरक (आले) 2 हेक्टर,पपई 5 हेक्टरवर तर विविध भाजीपाल्याची 607 हेक्टरवर लागवड झालेली आहे. 01 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान किनवट तालुक्यात पडणारा वार्षिक पाऊस 1026.58 मि.मी.असून, या तुलनेत आतापर्यंत तालुक्यात 45.16 टक्के पाऊस पडलेला आहे. जून व जुलै मध्ये अपेक्षित सरासरीच्या आसपास पाऊस पडत असून, तो समाधानकारक आहे. यंदा किनवट तालुक्यातील जलधारा मंडळात दोनदा तर सिंदगी मोहपूर मंडळात एकदा अतिवृष्टी झाल्यामुळे त्या भागातील पिकांना बरीचशी बाधा पोहोचली असून, शेतकऱ्यांकडून त्या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment