दलित पँथरचे दोन अध्याय आहेत. पाहिला १९७२ सालात स्थापन होवून १९७७ सालात बरखास्त झालेल्या अल्पजीवी पँथरचा. ती पँथर राजा ढाले - नामदेव ढसाळ यांच्या नावाने ओळखली गेली.अन् त्या दोघा नेत्यांमधील वादांमुळेच फुटली!
तर, दुसरा अध्याय आहे तो १९७७ मध्येच पुनरुज्जीवन करण्यात आलेल्या आणि मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रश्नाने संजीवनी दिलेल्या भारतीय दलित पँथरचा. तिचे नायक होते प्रा. अरुण कांबळे, गंगाधर गाढे आणि रामदास आठवले. पण १९९० पूर्वी झालेल्या रिपब्लिकन ऐक्यात त्या पँथरचाही ' बळी ' दिला गेला!
गेल्या वर्षी स्थापनेचा सुवर्ण महोत्सव साजरा झालेल्या दलित पँथरचा संस्थापक कोण, हा निरर्थक वाद १९८० च्या दशकापासून आजवर चघळला गेला आहे. त्यातून बरखास्तीनंतर विस्मृतीत, विजनवासात गेलेल्या मूळच्या पँथरच्या पाच नेत्यांची नावे चर्चेत राहण्या पलीकडे काही साधलेले नाही.
पँथरचे अस्सल संस्थापक कोण आणि तिचा खरा स्थापना दिन कुठला हा नसता वाद कुणी कितीही पेटता ठेवोत ; तरीही पहिल्या अध्यायात ती संघटना बरखास्त करण्याचा निर्णय घेऊनही पँथरचा चेहरा - मोहरा राजा ढाले हेच कायम राहिले. त्यामुळेच त्यांनी नंतरच्या काळात मास मुव्हमेंट, सम्यक क्रांती आणि भारिप - बहुजन महासंघ असा प्रवास केला असला तरी त्यांची पँथरचे नायक ही ओळख आणि प्रतिमा अमीट राहिली. निर्वाण झाल्यानंतर त्यांना आंबेडकरी समाजाने
' पँथर नेता ' म्हणूनच अखेरचा निरोप दिला होता.
तर, दुसऱ्या अध्यायात रामदास आठवले हे भारतीय दलित पँथरचा चेहरा बनले होते. ही वस्तुस्थिती कुणी कितीही नाकारली तरी त्याने वास्तव आणि इतिहास अजिबात बदलणार नाही.
आज राजा ढाले यांचा जन्म दिन म्हणजे जयंती. त्यांच्या नावात ' ढाल ' असली तरी बचावात्मक पवित्रा त्यांनी कधीच घेतला नाही. ते कायम आक्रमक आणि चित्त्याच्या आवेशात तुटून पडले हा त्यांचा स्थायीभाव होता.
गाढे अभ्यासक असलेल्या या विचारवंताचा पिंड हाच मुळी चिकित्सकाचा, समिक्षकाचा म्हणजे अप्रियता ओढवून घेणारा होता. त्यांचा हा गुण राजकारणात दोष आणि अडसर ठरणारा होता. त्यामुळे राजकारणात ते यशस्वी नेता म्हणून प्रस्थापित होवू शकले नाहीत, हे खरे आहे. पण त्यांनी दीर्घकाळ चळवळीत वैचारिक नेतृत्व समर्थपणे केले. ' रिडल्स 'च्या लढ्यात वैचारिक पातळीवरील लढाईत राजा ढाले आणि प्रा. अरुण कांबळे हे दोघेच खरे नायक राहिले होते.
ढाले हे भाषा प्रभू , प्रतिभा संपन्न, समीक्षक, कवी, चित्रकार होते. पँथर पासून रिडल्स लढ्यात त्यांनी तयार केलेल्या घोषणा मर्मभेदी आणि लक्षवेधी ठरल्या होत्या. पँथरच्या आंदोलनांमध्ये त्यांची एक घोषणा होती -
माणसं मारा, गाईला तारा
मानवतेचा ढोंगी नारा
तर, रिडल्स लढ्यावेळी ढाले यांची एक घोषणा होती -
गाळा, वगळा ते परिशिष्ट
गातात सारे हिंदुत्वनिष्ठ
ते तर शिष्ट, पोथीनिष्ठ
स्मृतीशेष राजा ढाले यांना विनम्र अभिवादन! 🙏💐
No comments:
Post a Comment