किनवट : गत दोन दिवसांपासून तालुक्यात सर्वदूर पाऊस बरसत असून, आज सोमवारी सकाळी तालुक्यातील जलधारा मंडळात यंदाच्या पहिल्या अतिवृष्टीची नोंद झाली आहे. उर्वरीत आठ महसुली मंडळात गेल्या दोन दिवसात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला आहे. सोमवारी सकाळी संपलेल्या गत 24 तासात तालुक्यांतील नऊ मंडळातील एकूण पाऊस 258.5 मि.मी.असून, त्याची सरासरी 28.72 मि.मी.येते.
मॉन्सून सक्रिय होण्यासाठी पोषक हवामान तयार झाल्याने, दि.05 ते 10 जुलै दरम्यान राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. तो बहुतांशाने खरा ठरलेला आहे. तालुक्यात गतवर्षी सारखा जून कोरडा न जाता यंदा जूनमध्ये पाऊस जेमतेम सरासरी एवढाच पडलेला आहे. जून अखेर किनवट तालुक्यात पडणाऱ्या पावसाची सरासरी 189.5 मि.मी.असते. परंतु, यंदा जूनअखेर त्याच्या जवळपास सरासरी 188.7 मि.मी.पाऊस पडला असून, त्याची 30 जून रोजीच्या सरासरीशी टक्केवारी 99.58 येते.
अनेक कोरडवाहू शेतकऱ्यांनी जूनमध्ये पडलेल्या सरासरीच्या जवळपास पडलेल्या पावसावरच पेरणी आटोपून घेतली होती. त्या पिकांना गत दोन दिवसाच्या पावसाने बऱ्यापैकी जीवदान मिळाले आहे.
शासनाच्या निकषानुसार गत 24 तासात 64.5 मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाल्यास, त्याची नोंद अतिवृष्टी म्हणून केली जाते. त्या अनुषंगाने जलधारा मंडळात 77.5 मि.मी. पाऊस झाल्याने, या मंडळात यंदाच्या पहिल्या अतिवृष्टीची नोंद झालेली आहे.
सोमवारी सकाळी संपलेल्या गत 24 तासात किनवट तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे असून, कंसात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय एकूण पावसाची नोंद दिलेली आहे. किनवट- 18.0(288.9 मि.मी.); बोधडी- 05.0(169.2 मि.मी.); इस्लापूर- 36.3(287.5 मि.मी.); जलधरा- 75.5 (366.8 मि.मी.); शिवणी- 23.5(264.3 मि.मी.); मांडवी- 35.3(337.2 मि.मी.); दहेली- 18.8(219.1 मि.मी.), सिंदगी मो. 15.8 (329.8 मि.मी.); उमरी बाजार 28.3 (282.0 मि.मी.).
तालुक्यात एक जूनपासून नऊ मंडळात मिळून आजपर्यंतचा पडलेला एकूण पाऊस 1696.30 मि.मी.असून, त्याची सरासरी 188.48 मि.मी.येते. आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक पाऊस जलधारा मंडळात झाला असून, सर्वात कमी बोधडी मंडळात झालेला आहे. तालुक्यात सोमवार 08 जुलै पर्यंत पडणारा अपेक्षित सरासरी पाऊस 266.20 मि.मी.असून, त्या तुलनेत 106.31 टक्के पाऊस पडलेला आहे.
01 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान किनवट तालुक्यात पडणारा सरासरी वार्षिक पाऊस 1026.58 मि.मी.असून, या तुलनेत आतापर्यंत तालुक्यात केवळ 27.57 टक्के पाऊस पडलेला आहे. या पावसाने पेरणी वाया जाण्याच्या भीतीने चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.
No comments:
Post a Comment