किनवट : तालुक्यातील पावसाचा जोर कायम असून, सर्व मंडळात मध्यम ते दमदार पाऊस कोसळत आहे. रविवारी (दि.28) सकाळी घेतलेल्या नोंदीप्रमाणे नऊ मंडळात झालेला एकूण पाऊस 279.9 मिलीमीटर असून, त्याची सरासरी 31.10 मि.मी.आहे.
राज्यातील पावसाचा जोर मंदावल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले असले तरी, किनवट तालुक्यात पाऊस थांबण्याची कुठलीच चिन्हे दिसत नाहीत. गत आठ दिवसापासून ढगाळलेले कुंद वातावरण असून, सतत थोड्या-थोड्या वेळाने पावसाची बॅटिंग सर्वदूर चालू आहे. गेल्या आठवडाभर सततच्या पावसामुळे शेतात कुठलीच कामे केल्या जाऊ शकली नाहीत. त्यामुळे अनेक भागातील खरीप पिकांमध्ये भरमसाट तण माजले आहे. पाऊस थांबून जमिनीत थोडा वाफसा आल्यानंतरच पिकामध्ये निंदण व कोळपणी होऊ शकेल म्हणून शेतकरी आता पावसाने थोडी उसंत घ्यावी म्हणून मनोमनी प्रार्थना करीत आहेत. अजून दोन-तीन दिवस असाच पाऊस कोसळला तर पिके मोठ्या प्रमाणावर बाधित होण्याची शक्यता आहे.
रविवारी (दि.28) सकाळी आठ वाजता संपलेल्या गत 24 तासात किनवट तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे असून, कंसात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय एकूण पावसाची नोंद दिलेली आहे. किनवट- 26.5 (571.6 मि.मी.); बोधडी- 23.8(411.3 मि.मी.); इस्लापूर- 26.0 (513.3 मि.मी.); जलधरा- 19.3 (732.5 मि.मी.); शिवणी- 22.0(490.3 मि.मी.); मांडवी- 44.5(560.0 मि.मी.); दहेली- 39.3 (474.7 मि.मी.), सिंदगी मो. 34.0 (594.4 मि.मी.); उमरी बाजार 44.5 (525.9 मि.मी.).
तालुक्यात एक जूनपासून नऊ मंडळात मिळून आजपर्यंतचा पडलेला एकूण पाऊस 4,874 मि.मी.असून, त्याची सरासरी 542 मि.मी.येते. तालुक्यात सर्वाधिक पाऊस जलधारा मंडळात झाला असून, सर्वात कमी बोधडी मंडळात झालेला आहे. ही स्थिती पावसाळ्याच्या सुरूवातीपासून कायम आहे. तालुक्यात रविवारी दि.28जुलै पर्यंत पडणारा अपेक्षित सरासरी पाऊस 457.9 मि.मी.असून, त्या तुलनेत 84.1 मिलीमीटर पाऊस जास्त पडलेला आहे. 01 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान किनवट तालुक्यात पडणारा वार्षिक पाऊस 1026.58 मि.मी.असून, त्या प्रमाणात आतापर्यंत तालुक्यात सरासरी 52.8 टक्के पाऊस पडलेला आहे. गत वर्षी आजच्या दिवसापर्यंत यंदापेक्षा जास्त अर्थात 759.40 मि.मी.पाऊस पडला होता. आज रोजी पर्यंत पडणाऱ्या अपेक्षित सरासरी पावसाच्या तुलनेत गतवर्षी त्याची टक्केवारी 165.84 एवढी होती.
No comments:
Post a Comment