तुम्ही कितीही लावा शक्ती
तुम्ही कितीही लढवा युक्ती
तुम्ही करा रे कितीही हल्ला
लय मजबुत भीमाचा किल्ला...
अशा अनेक अजरामर गीतांचे भीमगीतकार विजयानंद जाधव यांचा दि ३० जुलै स्मृतीदीन... त्यानिमित्त लेख.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या शाहिरी परंपरेतील महत्वाचे नाव म्हणजे भीमशाहीर विजयानंद जाधव...
आंबेडकरी चळवळीचे भक्कम आधार स्तंभ असलेल्या आंबेडकरी जलस्याने सामाजिक परिवर्तनामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे नेतृत्व अपत्यक्ष्यपणे शाहिरांनी निष्ठेने जोपासले यात शंका नाही. कारण खुद्द डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आद्य आंबेडकरी जलसेकार भीमराव कर्डक यांच्या जलस्यांना उद्देशून जाहीर सभेत म्हणाले होते, माझ्या १० सभा-भाषणा बरोबरीचा कर्डक आदी मंडळींचा एक जलसा आहे". यावरून आपणाला लक्षात येईल की बाबासाहेबांनी देखील आंबेडकरी जलसे आणि शाहिरांचे महत्व ओळखले होते.हा ज्ञान धनाचा साठा ऐतीहासिकदृष्ट्या किती महत्वाचा आहे? याचे महत्त्व पटवून देण्याची दखल साहित्यिक संशोधकांनी घेतली. ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक प्रा अविनाश डोळस स्मृतीशेष भीमशाहीर समदुर सारंग यांच्या गीताला उद्देशून म्हणतात की
' महा आबा म्हणे बाप महा बाप म्हणतो बाप मीही म्हणतो बाप मावं पोरग म्हणते बाप असं शोधून पाहा जगात असं हाय का कुणाचं कुणाशी माह्या भीमा सारखं नातं"
या एकाच गीताची निर्मिती केली असती तरी समदुर सारंग आंबेडकरी चळवळीत अजरामर झाले असते.
या वाक्याला प्रमाण माणुन अनेक शाहिरांनी आंबेडकरी चळवळीत आपली महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी कसलीच पर्वा न करता बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायाच्या धेय्याने झपाटून सहज सोप्या भाषेतील लिखानाला संगीतबद्ध करून डफावर दमदार थाप आणि पहाडी आवाजात सामन्यातील सामान्य माणसाला जागृत करण्याचे काम केले. या पहिल्या पिढीत भीमराव कर्डक, कविरत्न केरूजीबुवा गायकवाड, आचार्य दीनबंधु शेगांवकर गुरुजी आदींसह अनेक शाहिरांचा उल्लेख आढळतो. तसेच पुढे काही काळानंतर आंबेडकरी जलस्याचे विकसित रूप म्हणून कव्वाल पार्ट्या गायन पार्ट्या उदयाला आल्यात. राजानंद गडपायले, गोविंद म्हशिलकर, नागोराव पाटणकर, प्रल्हाद शिंदे यात अग्रगण्य नाव म्हणजे महाकवी वामनदादा कर्डक.
दादांनी तहान भूक विसरून समाज एकसंध ठेवण्यासाठी हजारो किलोमिटर प्रवास केला.दहा हजारांच्या जवळपास विविध विषयावरील सहज साध्या भाषेतील अर्थपुर्ण गीतं लिहिले.महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्र बाहेर देखील स्वतः सादर केली. आंबेडकरी गीत गायन परंपरा अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी शिष्य निर्माण केले. त्यापैकी अग्रक्रमाने स्मृतिशेष प्रतापसिंगदादा बोदडे आणि स्मृतिशेष विजयानंद जाधव. दोघांचीही साम्य स्थळे दोघेही महाकवी वामनदादा कर्डक यांचे अत्यंत आवडते शिष्य.दोघेही उत्तम गायक,गीतकार आणि संगीतकार.उच्च शिक्षित आणि शासकीय नोकरदार.दोघेही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद कला महाविद्यालयातील विद्यार्थी.महाकवी वामनदादा कर्डक यांच्या गीतांची छबी या दोघांच्याही गाण्यात बघायला मिळते. ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक समीक्षक डॉ ऋषिकेश कांबळे म्हणतात, "मी विजयानंद जाधव यांची अनेक गीतं वाचली. त्यामध्ये महाकवी वामनदादा कर्डक यांच्या गीतांचे विलक्षण साम्य आढळते."
विजयानंद जाधव यांचा जन्म २ जून १९५६ रोजी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वडोद ह्या अतिशय छोट्या गावात झाला.त्यांचे वडील भजन गायचे त्यामुळे गाण्याचे संस्कार लहानपणीच त्यांच्यावर पडले.शिक्षणाचे महत्व त्यांच्या आई बाबांनी ओळखल्यामुळे त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद कला महाविद्यालयात पाठविले. शिकत असताना त्यांची चळवळीतील बाराखडी गिरवने सुरू झाले.पुढे त्यांची ओळख महाकवी वामनदादा कर्डक यांच्या सोबत कार्यक्रमात झाली.वामनदादांच्या सोबत गायन करण्याची संधी त्यांना मिळाली.याविषयी त्यांचे चिरंजीव अमोल विजयानंद जाधव यांनी सांगितले की, वामनदादांची ओळख होण्यापूर्वी आणि उच्च शिक्षित होण्यापूर्वी घरची परिस्थिती बेताची असल्याने मिळेल ते काम केले.त्यांनी हरिभाऊ अन्विकर यांच्या तमाशात देखील काम केले.राष्ट्रीय प्रबोधनकार राहुल अन्विकर देखील विजयानंद जाधव यांच्या संगीत आणि गायनाची दाद देतात.ते म्हणायचे त्यांच्या ढोलकीचा तोडा संपूर्ण प्रेक्षकांना खिळवून ठेवायचा. मिलिंद महाविद्यालयातील ऐका कार्यक्रमात दादांच्या गायनाला कोरस करताना विजयानंद यांनी आवळलेला मंजुळ स्वर दादांच्या हृदयात भिडला.खुद्द वामनदादा विजयानंद यांच्याकडे हसून बघून क्या बात है उद्गारले आणि तिथून पुढे याच प्रवासातून त्यांच्यातील गायक गीतकार आणि संगीतकाराचा उदय होत गेला.परिचय वाढल्याने वामनदादा आंबेडकरी गीतांचे महत्व समजावून सांगितल्यामुळे विजयानंद जाधव यांनी तमाशाची वाट कायमची सोडली आणि उच्च शिक्षित होऊन कृषिविभागात नोकरीला असल्याने पुढे जेव्हा कधी वामनदादा औरंगाबादला यायचे तेव्हा त्यांचा मुक्काम विजयानंद जाधव यांच्या घरीच असायचा.त्यांनी दादांसाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था केली होती.दादांनी अनेक गीतं त्यांच्या कडे लिहिली.वामनदांच्या प्रत्येक कार्यक्रमात विजयानंद जाधव सहगायन करायचे.डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामांतर लढा संपूर्ण महाराष्ट्रात पेटला होता.विविध ठिकाणी सभा बैठका होत होत्या. अशाच एका जाहीर सभेत हजारो लोकांच्या साक्षीने विजयानंद जाधव यांनी त्यावेळी लिहीलेले कर रे सरकार कर आमची मागणी मंजुर कर,
विद्यापीठाला दे या नाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ||
हे गीतं सादर केले होते.हे गीतं संपूर्ण मराठवाड्यात प्रचंड गाजले. या पुढे बीड जिल्ह्यातील परळी येथे जाहीर सभेत "भारता भारता तु कश्याचा महान रे
तुझ्याचं घटनाकाराचा होतो इथे अपमान रे"
त्या गीताने प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान केल्याने विरोधकांनी पोलिसांना पाचारण करून विजयानंद जाधव यांना अटक झाली होती.या प्रसंगाने विजयानंद जाधव सर्वपरिचित झाले होते.सम्राटकार बबन कांबळे साहेब यांच्या भीमबाणा या महानाट्य मध्ये "तुम्ही करारे कितीही हल्ला लय मजबुत भीमाचा किल्ला" हे पुण्यातील येवले बंधूंनी गायलेले गाणे मोठ्या ताकदीने सादर होत असे. आनंद शिंदे मिलिंद शिंदे यांनीही या गीतांचे गायन केले आहे.
'दिसतं तसं नसतं' या चित्रपटातलं गीत 'दिसाची करीनं मी रात घेउन हातात हात' सुप्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांनी गायले आहे.
विजयानंद जाधव यांनी हजारो विविध विषयावर भीमगीत, ग़झ़ल,कव्वाली,हूंडाबळी गीते लिहिली.आजही आकाशवाणीवर बरीचं गाणी वाजतात.अनेक आघाडीचे युवा गायक त्यांची गाणी गातात. आंबेडकरी शाहिरी परंपरेतील योध्या दि ३० जुलै २००५ रोजी आकस्मिक निधन झाले.शरीर रूपाने जरी आज हयात नसतील तरी त्यांच्या गीताच्या रूपात समाज मनात जिवंत आहेत.नवीन पिढी मध्ये एवढ्या ताकदीचे लिखाण अजूनही आम्हास आढळत नाही.याविषयी अनेक कारणे असू शकतात.आंबेडकरी गायन चळवळीचे झालेले व्यावसायिकरण यातील मोजकेच नाव आपल्या समोर दिसतात.परंतु ज्यांनी आयुष्यभर निष्ठेने विचारांची जपणूक केली ती मात्र यातून दुर्लक्षित राहतात.आंबेडकरी चळवळीतील त्यांचे योगदान आणि त्यांच्या स्मृतींचा अमूल्य ठेवा जोपासण्याचे महत्तम कार्य चिरंजीव अमोल विजयानंद जाधव २०१५ पासून शाहीर विजयानंद जाधव प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगर माध्यमातून दरवर्षी व्याख्यान आणि महाराष्ट्रातील अनेक आंबेडकरी गायकांना आमंत्रित करून संगीत मैफिलीचे आयोजन करतात. समाजातील सगळ्या अभ्यासकांना जाणकारांना विशेष करून तरुणाईला विजयानंद जाधव यांच्या योगदाना विषयी माहिती व्हावी, म्हणून त्यांच्या स्मृतिदिनी लिहिलेला लेख.स्मृतीदिनी विजयानंद जाधव यांना विनम्र अभिवादन करतो.
No comments:
Post a Comment