किनवट (प्रतिनिधी) : माहूर-किनवट 161 ए या राष्ट्रीय महामार्गावर डॉ.आंबेडकर चौक ते अय्यप्पा स्वामी मंदिरापर्यंत दुभाजकाच्या मध्यभागी सुमारे वर्षभरापूर्वी बसविलेल्या स्ट्रिट लाईटस्ची जनरेटरद्वारे टेस्टिंग होऊनही अद्यापही बंद पथदिवे सुरू न करण्यामागे काय गौडबंगाल आहे? हे नागरिकांना कळत नसून, रात्री अकरापर्यंत रहदारीने गजबजलेला हा काळोख मार्ग त्वरित प्रकाशमान करावा, अशी मागणी शहरवासीय करीत आहेत.
सुमारे एक वर्षभरापूर्वी या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या वेळी या रस्त्यावरील दुभाजकासह स्ट्रिटलाईटचे खांब काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर तब्बल दहा महिन्यानंतर ते स्ट्रिटलाईटचे खांब बसविण्यात आलेत. त्याची जनरेटरद्वारे चालू करण्याची टेस्टिंगही करण्यात आली. त्यानंतर नगरपालिकेच्या नावे विजेचे मीटर घेऊन पथदिवे चालू केल्यानंतर ते ताब्यात देणार असल्याचे महामार्गाच्या उपअभियंत्यांनी गेल्या पाच महिन्यापूर्वी सांगितले होते. पण, नंतर घोडे कुठे अडले? अन् माशी कुठे शिंकली ? हे कळायला मार्ग नाही. गत वर्षभरापासून हे विजेचे खांब व पथदिवे हे निव्वळ शोभेच्या वस्तू म्हणून मिरवत आहेत. या भागातील महामार्गाचे काम पूर्ण होऊनही पथदिवे बंद असल्यामुळे, रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेली मोकाट जनावरे, बसस्थानक परिसरात महामार्गाच्या कडेला लागून ठेवलेली विविध खाद्यपदार्थाचे हातगाडे, ठेले हे अंधारात दिसत नसल्यामुळे वाहनधारकांची कुचंबणा होत असून, जीव मुठीत घेत प्रवास करावा लागतो. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पादचाऱ्यांना सरपटणाऱ्या प्राण्यांचाही धोका संभवू शकतो. या सर्व गोष्टीकडे पालिका प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे. एखाद्या गंभीर अपघातानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का? असे एक ना अनेक प्रश्न संतप्त नागरिक विचारीत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने लवकारात लवकर या महामार्गावरील पथदिवे चालू करून, नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
No comments:
Post a Comment