‘‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’’ योजना : किनवट विधानसभा शासकीय समिती अध्यक्षपदी आ.भीमराव केराम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 12 August 2024

‘‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’’ योजना : किनवट विधानसभा शासकीय समिती अध्यक्षपदी आ.भीमराव केराम

किनवट :  "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेची प्रभावी व सुलभतेने अंमलबजावणी करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी किनवट-माहूर विधानसभा क्षेत्रासाठी समिती गठीत केली असून, या समितीच्या अध्यक्षस्थानी आमदार भीमराव केराम यांची नेमणूक केली आहे. तसेच अशासकीय सदस्य म्हणून वैजनाथ करपुडे पाटील व सुदर्शन नाईक यांची नियुक्ती झालेली आहे. महिला व बाल विकास विभागाने 25 जुलै रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यात दिलेल्या निर्देशानुसार उपरोक्त किनवट विधानसभा क्षेत्रासाठी समिती गठित करण्यात आली आहे.


महाराष्ट्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना म्हणून राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नियोजनबद्ध व परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने प्रत्येक विधानसभानिहाय शासकीय समिती गठीत करण्यात आली आहे. किनवट विधानसभा मतदारसंघातील नियुक्त  शासकीय समिती आमदार भीमराव केराम  यांच्या अध्यक्षतेखाली काम करणार आहे. या समितीचे सदस्य सचिव  बालविकास प्रकल्प अधिकारी असणार आहेत. तहसीलदार, गटविकास अधिकारी व नांदेड महानगरपालिकेने नामनिर्देशित केलेली व्यक्ती (न.प.मुख्याधिकारी,किनवट ? ) यांचा शासकीय सदस्य म्हणून समावेश आहे.


    या योजनेची विधानसभा क्षेत्रनिहाय देखरेख व संनियत्रण करणे, योजनेच्या अंमलबाजणीबाबत नियमित आढावा घेणे, कालबध्द पध्दतीने पात्र लाभार्थीची यादी अंतिम करणे व सदर योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेणे, तसेच या समितीच्या नियंत्रणात किनवट विधानसभाक्षेत्रातून प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी केल्या जाऊन, संभाव्य पात्र लाभार्थी महिलांच्या याद्या जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करणे आदी कामकाज या समितीच्या माध्यमातून केले जाणार आहे. या नियुक्तीबद्दल आमदार भीमराव केराम यांचेसह  दोन्ही अशासकीय सदस्य वैजनाथ करपुडे पाटील व सुदर्शन मेश्राम सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. बहिणींना कुठलीही अडचण आल्यास माझ्या " लोकार्पण " या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन आ. भीमराव केराम यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages