ठाणे :
साहित्यिक , पत्रकार मनीष वाघ यांच्या ‘ वाघनखं’ (वैचारिक लेखसंग्रह) आणि साहित्यिक विनोद पितळे लिखित ‘ होय होय वारकरी’ ( ललित गद्य) या दोन ग्रंथांचे नुकताच कर्जत येथे संयुक्त प्रकाशन करण्यात आले.
मनीष वाघ हे गेली अनेक वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्य करीत आहेत. त्यांनी सामाजिक , राजकीय, पर्यावरण , आरोग्य या विषयांवर विविध लेख , संपादने तसेच ग्रंथ लिहिले आहेत. तसेच चार कविता संग्रह देखील प्रकाशित झाले आहेत. तर विनोद पितळे हे कवी गझलकार असून त्यांनी कविता , गझलसंग्रह , बालनाटय, एकांकिका , चरित्र , ललित गद्य आदि साहित्य प्रकारातून विपुल ग्रंथ प्रकाशित केले आहेत. या दोनही लेखकांच्या ग्रंथाचे प्रकाशन समर्थ रेसिडेन्सी कर्जत येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याचे संपूर्ण नियोजन , मार्गदर्शन जेष्ठ साहित्यिक , कोकण मराठी साहित्य परिषदेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळ कांदळकर यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विनोदी व विज्ञान कथा लेखक शिरीष नाडकर्णी हे होते. ग्रंथ भाष्य करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. हरेंद्र सोष्टे उपस्थीत होते , तर प्रमुख मान्यवर म्हणून नगरसेवक दीपक मोरे हे होते . कार्यक्रमास अर्जुन बांबेरे , निशिकांत महांकाळ , अजित महाडकर , आकाश आमकर , किशोर पराड यांची उपस्थिती लाभली . मान्यवरांच्या हस्ते दोन्ही ग्रंथांचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळ कांदळकर यांनी केले . आपल्या प्रस्ताविकात त्यांनी आपल्या दोन्ही मित्रांनी केलेल्या लेखनाची प्रशंसा करीत त्यांना सदिच्छा दिल्या . उपस्थित मान्यवरांनी ग्रंथांविषयी अभिप्राय आपल्या वक्त्यव्यातून नोंदविला . कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरीष नाडकर्णी आपल्या भाषणात म्हणाले “ लेखक आपल्या अवती भोवती घडणाऱ्या घटनांविषयी किती सजगपणे बघतो आणि वर्तमान लेखनातून मांडतो हे या दोन्ही लेखकाच्या लेखनातून ठळकपणे आढळते “ दरम्यान अतिथी महनून लाभलेले नगरसेवक दीपक मोरे यांनी “ राजकीय पुढाऱ्यांना व्यकत होण्यासाठी साहित्याचा आधार घ्यावा लागतो “ असे म्हणून “ समाजाला शिस्त लावण्याचे काम साहित्य करते “ असेही प्रतिपादन केले. प्रा. हरेंद्र सोष्टे यांनी दोन्ही लेखकांच्या पुस्तकातील आशयाचा आणि अभिव्यक्तीचा समीक्षणात्मक आढावा घेत मांडणी केली. दरम्यान उपस्थित बाळ कांदळकर यांनी व अन्य कवींनी उत्स्फूर्त काव्य सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित महाडकर यांनी केले. या कार्यक्रमाला अनेक कवी साहित्यिक यांची उपस्थिती लाभली तसेच कर्जत परिसर व समर्थ रेसिडन्सी येथील वाचक , रसिक उपस्थित होते . त्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले .
No comments:
Post a Comment