किनवट (प्रतिनिधी) : तालुक्यात शनिवारी मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. काल रात्रभर झालेल्या पावसाच्या कहरामुळे तालुक्यातील नऊही मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून, यंदाची ही चौथी अतिवृष्टी आहे. रविवारी सकाळी संपलेल्या गत 24 तासात तालुक्यातील नऊ महसूल मंडळात बरसलेला एकूण पाऊस 1,231 मि.मी. असून, त्याची सरासरी 136.78 मिलिमीटर आहे.
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड, हिंगोली, परभणी या तीन जिल्ह्यांमध्ये त्याच दिवसाच्या रात्रीसाठी रेड अलर्ट जारी होता. त्यानुसार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 41 ते 61 कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवून.नागरिकांना काळजी घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार नांदेड जिल्हातील तब्बल 26 मंडळात अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. गुजरात किनारपट्टीवर घोंघावत असलेल्या ‘असना’ चक्रीवादळामुळे राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली असून, चार सप्टेंबरपर्यंत सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
मौसम विभागाच्या निकषानुसार 64.5 ते 115.5 मि.मी. पर्यंत पडलेला पाऊस हा अतिवृष्टीमध्ये तर 115.6 ते 204.4 मि.मी. पर्यंत पडणारा पाऊस हा अतिवृष्टीपेक्षा जास्त अर्थात खूप जोरदार अतिवृष्टीत गणला जातो. या अनुषंगाने काल शनिवारी झालेल्या पावसामध्ये किनवट तालुक्यातील बोधडी,शिवणी व दहेली या मंडळात अतिवृष्टी तर किनवट, जलधारा, इस्लापूर, मांडवी, सिंदगी मोहपूर व उमरीबाजार या सहा मंडळात खूप जोरदार अतिवृष्टी झालेली आहे. या तुफान अन् कोसळधार पावसामुळे नदी,नाल्याकाठच्या शेतात पाणी शिरून आणि उतार असलेल्या शेतातील भागात पाण्याच्या प्रवाहाने जमीन खरडल्या जाऊन खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे समजते. . किनवट तालुक्यात यंदाच्या जुलै महिन्यातच झालेल्या तीन अतिवृष्टीमध्ये पहिली 08 जुलैला जलधारा मंडळात पुढे दुसरी 16 जुलैला जलधारा व सिंदगी मोहपूर मंडळात तर 31 जुलै रोजी तिसरी अतिवृष्टी परत सिंदगी मोहपूर मंडळात झाली होती. तालुक्यात आज रविवारी (दि.01) सर्व (नऊ) मंडळात झालेली अतिवष्टी ही यंदाची चौथी अतिवृष्टी आहे.
रविवारी सकाळी संपलेल्या गत 24 तासात किनवट तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे असून, कंसात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय एकूण पावसाची नोंद दिलेली आहे. किनवट- 140.0 (979.6 मि.मी.); बोधडी- 81.3 (690.6 मि.मी.); इस्लापूर- 165.0 (851.1 मि.मी.); जलधरा- 138.0 (1,024.1 मि.मी.); शिवणी- 102(757.7 मि.मी.); मांडवी- 153.3 (985.4.मी.); दहेली- 112.3 (842.9 मि.मी.), सिंदगी मोहपूर 178.8(1,046.7 मि.मी.); उमरी बाजार 160.3 (948.4 मि.मी.).
तालुक्यात एक जूनपासून नऊ मंडळात मिळून आजपर्यंतचा पडलेला एकूण पाऊस 8,126.5 मि.मी.असून, त्याची सरासरी 903.30 मि.मी.येते. आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक पाऊस सिंदगी मोहपूर मंडळात झाला असून, सर्वात कमी बोधडी मंडळात झालेला आहे. तालुक्यात रविवारी दि.01 सप्टेंबरपर्यंत पडणारा अपेक्षित सरासरी पाऊस 786.8 मि.मी.असून, त्यापेक्षा थोडासा जास्त पाऊस प्रत्यक्षात पडलेला आहे. त्याची टक्केवारी 114.81 आहे.
01 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान किनवट तालुक्यात पडणारा वार्षिक सरासरी पाऊस 1026.58 मि.मी.असून, या तुलनेत आतापर्यंत तालुक्यात सरासरी 87.99 मि.मी. पाऊस पडलेला आहे. गतवर्षी आजच्या दिवसापर्यंत 912.50 मि.मी.पाऊस पडला होता. आज रोजी पर्यंत पडणाऱ्या अपेक्षित सरासरी पावसाच्या तुलनेत त्याची टक्केवारी 115.98 एवढी होती.
No comments:
Post a Comment