बौद्ध अनुयायांचा ७ ऑक्टोबर ला 'बौद्ध लेणी बचाव मोर्चा ; बौद्ध लेणीच्या संरक्षणार्थ एकवटले आंबेडकरी कार्यकर्ते ; अखिल भारतीय भीक्खु संघ करणार नेतृत्व - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 1 October 2024

बौद्ध अनुयायांचा ७ ऑक्टोबर ला 'बौद्ध लेणी बचाव मोर्चा ; बौद्ध लेणीच्या संरक्षणार्थ एकवटले आंबेडकरी कार्यकर्ते ; अखिल भारतीय भीक्खु संघ करणार नेतृत्व

छ.संभाजीनगर दि.०१: बौद्ध लेणी च्या पायथ्याशी मागील ६० ते ७० वर्षांपासून असलेले विपश्यना बुद्ध विहार व भिक्खु कुटीस अतिक्रमण असल्याचे संबोधून बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या वतीने भारतीय न्याय संहितेच्या कलम 168 प्रमाणे नोटीस बजावण्यात आल्याने आंबेडकरी अनुयायी एकवटले असून दि.०७ ऑक्टोबरला लाखों बौद्ध अनुयायी अखिल भारतीय भीक्खु संघाच्या नेतृत्वात 'बौद्धलेणी बचाव मोर्चा' काढणार असल्याचे सुभेदारी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.


बौद्धलेणी बचाव मोर्चात सर्व आंबेडकरी पक्ष संघटना गट तट विसरून सहभागी होणार असल्याने हा मोर्चा ऐतिहासिक होईल व किमान 2 लाख लोक मोर्चात सहभागी होतील असा अंदाज भीक्खु संघाने व्यक्त केला आहे.


जगभरातील बौद्धांचे श्रद्धास्थान असणाऱ्या औरंगाबाद/ छ. संभाजीनगर येथील बौद्ध लेण्यांच्या सोबतच पायथ्याशी असलेल्या विपश्यना बुद्ध विहार येथे मागील ६० ते ७० वर्षांपासून बौद्ध अनुयायी श्रद्धेने नतमस्तक होतात. लेण्यांची निर्मितीपासून पायथ्याशी बौद्ध भिक्खू चे वास्तव्य येथे राहिले असल्याने अनेक श्रद्धावान उपासक, लोकप्रतिनिधी यांच्या निधीतून, सहभागातून बौद्ध विहार, भिक्खू कुटी, सभा मंडप व विविध सुविधांनी परिसराचा विकास करण्यात आला आहे.


 मुळात हजारो वर्षापासून बौद्धलेणी असताना पायथ्याच्या जागेची मालकी विद्यापीठाची कशी असेल असा प्रश्न उपस्थित करत याची शहानिशा न करता बौद्धांच्या या ऐतिहासिक स्थळाला हटविण्याच्या मागे मनुवादी सरकार असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला आहे.


'बौद्ध लेणी बचाव मोर्चा' तुन आपल्या या अस्तित्वाच्या, स्वाभिमानाच्या, अस्मितेच्या लढ्यात आंबेडकरी अनुयायांना सहभागी करून घेण्यासाठी घरोघरी जाऊन विभागनिहाय मोर्चाबाबत जनजागृती करण्यात येणार असून बौद्ध लेणी परिसर हा ऑक्सिजन हब असल्याने निसर्ग प्रेमींनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येणार आहे.




हा मोर्चा क्रांतिचौक येथून निघून पैठण गेट- टिळक पथ- गुलमंडी - सिटीचौक- म.गांधी पुतळा शहागंज - हर्ष नगर विभागीय आयुक्त कार्यालय, छ. संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन सभेद्वारे विसर्जित होईल भदंत विशुद्धानंद बोधी महास्थवीर हे मोर्चाचे नेतृत्व करणार असून महाराष्ट्र भरातील बौद्ध भीक्खु या मोर्चात सहभागी होणार असल्याचे भन्ते संघप्रिय यांनी सांगितले.


मोर्चातून खालील प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.


१) बौद्धलेणीच्या पायथ्याशी पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी ५० एकर जागा देण्यात यावी.

२) बौद्ध लेणी व परिसराचा समावेश बुद्धिस्ट सर्किट मध्ये करण्यात यावा.

३) बौद्ध लेणी व परिसराचा पर्यटन स्थळ व तिर्थक्षेत्राच्या यादीत समावेश करण्यात यावा.

४) बौद्ध लेणीत पायाभूत सुविधा उभारून अजिंठा लेणी च्या धर्तीवर प्रकाशयोजना करून लेणीच्या डोंगराच्या संवर्धनासाठी विशेष निधीची तरतूद करावी.

५) ऐतिहासिक अजिंठा लेणी मार्गावरील हर्सूल टी पॉईंट येथे भव्य बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात यावी.

६) अजिंठा लेणी मार्गाचे रखडलेले काम युद्धपातळीवर हाती घेण्यात यावे.

७) महाराष्ट्रातील सर्व बौद्धलेण्यावरील इतर धर्मियांचे अतिक्रमण तात्काळ हटविण्यात येऊन पायाभूत सुविधा देण्यात याव्या सर्व बौद्ध लेण्यांचा बुद्धिस्ट सर्किट व तीर्थक्षेत्र- पर्यटन स्थळात समावेश करावा.


पत्रकार परिषदेला भन्ते नागसेन बोधी महाथेरो, भंते संघप्रिय, ,भंते बोधीधम्म,भंते उपाली भंते निर्वाण, भंते आनंद यांनी भीक्खु संघाच्या वतीने भूमिका मांडली तर प्रकाश निकाळजे, दौलत खरात,रमेशभाई खंडागळे, गौतम लांडगे, संजय जगताप, गौतम खरात, किशोर थोरात, अरुण बोर्डे, बंडू कांबळे, जालिंदर शेंडगे,दिपक निकाळजे, सचिन निकम,आनंद कस्तुरे, गुल्लू वाकेकर, विजय वाहुळ,अमित वाहुळ, मुकेश खोतकर, विजय शिंदे, सचिन जोगदंडे,सोनू नरवडे, कपिल बनकर, संतोष चव्हाण नागेश जावळे, दत्ता जाधव, नागेश केदारे, आनंद बोर्डे, मेघानंद जाधव, गंगा पाईकराव, मिलिंद दाभाडे, गुणरत्न सोनवणे, अतुल कांबळे, अमर हिवराळे, पूनम गंगावणे,राहुल अंकुशे, आशिष मनोरे, मुकुंद जंजाळे, हरीश खेडकर, कमलेश नरवडे,सुरेश मगरे,विजय शिंगारे, अनामी मोरे,सचिन बनसोडे, राष्ट्रपाल गवई,संदिप वाहुळ, नितीन निकाळजे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages