किनवट (प्रतिनिधी) : किनवट तालुक्यातील यंदाच्या खरीप हंगामात गत 23 सप्टेंबरपर्यंत 36 हजार 573 शेतकरी खातेदारांनी एकूण 54 हजार 590 हेक्टर क्षेत्रातील ई-पीक पेरा पाहणी अर्थात नोंदणी केलेली असून, त्याची टक्केवारी 69.03 आहे. यापुढील ई-पीक पाहणी तलाठीस्तरावर करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.
किनवट तालुक्याचे भौगोलीक क्षेत्र 1,55,435.65 हेक्टर असून, खरीप हंगामासाठीचे सर्वसाधारण क्षेत्र 78 हजार 001 हेक्टर आहे. महसूल विभागाच्या नोंदीनुसार यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यातील 9 महसूल मंडळातील 171 गावामध्ये 79 हजार 077 हेक्टरवर पीक पेरणी झालेली असून, शेतकरी खातेदारांची एकूण संख्या 60 हजार 348 आहे. यानुसार अंतिम पीक पेरणी क्षेत्र व ई-पीक पाहणी क्षेत्रामध्ये 24 हजार 487 हेक्टरचा फरक आहे. मुदत संपल्यामुळे 23 हजार 775 शेतकरी खातेदारांची वैयक्तिकरित्या ई-पीक पाहणी करणे राहून गेले आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांचा पेरा ई-पीक पाहणी अॅपवर नोंदविणे आवश्यक आहे. यंदा किनवट तालुक्यात पावसाच्या आगमनानुसार झालेल्या पेरण्या जुलैच्या तिसरा आठवड्यापर्यंत रखडल्या होत्या. त्यामुळे ई-पीक पेरा नोंदणीस उशिरा झाला. ई-पीक अॅपच्या वापराबाबत कृषी, महसूल, ग्रामविकास विभागाने पुरेशी जागृती करूनसुद्धा अनेक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीचे महत्व अजूनही समजलेले नाही. खरीप हंगाम 2024-25 मधील पीकपाहणी नोंदवण्यासाठी महसूल विभागाने दि. 01 ऑगस्टपासून सुरुवात केली होती. परंतु सततच्या वीज पुरवठा खंडित होण्यासह इतर तांत्रिक अडचणी, शासकीय सुट्ट्या, अवकाळी पाऊस अशा विविध कारणांमुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता आली नाही. त्यातच 15 सप्टेंबर ई-पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख होती. आडवळणाच्या भागातील शेतामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी व्यवस्थित मिळत नाही. सर्व्हर डाउन राहू लागले आदी कारणांमुळे ई-पीक पाहणी प्रक्रियेत गतीमानता नव्हती. तसेच ई-पीकपाहणी बाबत बरेच शेतकरी उदासीन आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील प्रत्येक गावातील किमान 200 शेतकऱ्यांची ई-पीक नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवून दोन दिवस विशेष मोहीम राबविली गेली. पुढे राज्य शासनाने शेतकरीस्तरावरील ई-पीक पाहणीच्या नोंदणीसाठी 23 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. परिणामी, 23 सप्टेंबरपर्यंत केल्या गेलेल्या ई-पीक पाहणीमध्ये 36 हजार 573 शेतकरी खातेदारांची 54 हजार 590 हेक्टर क्षेत्रापर्यंत वाढ झाली आहे. तरीही सुमारे 31 टक्के पेरणी क्षेत्राची ई-पीक पाहणी राहून गेली आहे. त्यामुळे ज्या 23 हजार 775 शेतकऱ्यांनी आपण पेरलेल्या पिकांची नोंद मोबाईल अॅपद्वारे ई-पीक पाहणीमध्ये केलेली नाही, त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ, नुकसान भरपाई मदत व किमान आधारभूत किंमतीनुसार खरेदीचा लाभ मिळविणे अवघड जाणार आहे. शासनाने या पुढील पीक पाहणीची मुदतवाढ तलाठीस्तरावर देखील देण्याचा निर्णय घेतला आहे. आता तलाठी स्तरावरील ई-पीक पाहणी तपासणीची मुदतीत देखील वाढ केली आहे . आता 24 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर या कालावधीत सहाय्यक आणि तलाठी हे देखील पीकपाहणी करू शकतील.
No comments:
Post a Comment