किनवट : महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा(ता.किनवट) येथिल ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयाच्या इयत्ता ११ वी आणि १२ वी मध्ये अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुभाष नगरातील कै.कांताराव रामतीर्थकर सार्वजनिक वाचनालयास शनिवारी(ता.१९) भेट दिली.महाविद्यालयीन अभ्यासाचा एक भाग म्हणून क्षेत्रभेटीच्या उपक्रमांतर्गत ही शैक्षणिक भेट होती.
या कार्यक्रमास ग्रंथालय चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते ॲड. मिलिंद सर्पे, वाचनालयाचे अध्यक्ष उद्धवराव रामतीर्थकर, प्रा.सुबोध सर्पे,ग्रंथपाल मयुरी रामतीर्थकर, ग्रंथालय लिपिक दत्ता हुस्सेकर आधी उपस्थित होते. वाचनालयाच्या वतीने ॲड.मिलिंद सर्पे, प्रा. सुबोध सर्पे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून एका विद्यार्थिनीस व एका विद्यार्थ्यास पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.
सार्वजनिक वाचनालयाची व्यवस्थापन प्रक्रिया समजून घेण्यासाठी सदर भेटीचे आयोजन करण्यात आलेले होते.महाविद्यालयाचे ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयाचे प्रा.सुबोध सर्पे यांनी सार्वजनिक वाचनालयाचे महत्त्वाचे दस्तऐवज, मराठी साहित्यामधील विविध पुस्तके, ग्रंथ देवघेव पद्धती, मुक्त प्रवेश पद्धत,बंदिस्त प्रवेश पद्धत, ग्रंथालयाचे प्रकार याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर अशी प्रात्यक्षिक माहिती दिली. वाचनालयाचे अध्यक्ष उद्धव रामतीर्थकर यावेळी बोलताना म्हणाले की,विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये पुस्तके जीवन घडवण्याची काम करतात. सार्वजनिक ग्रंथालये ही समाजातील लोकांचे निरंतर शिक्षण देणारी विद्यापीठे आहेत.
या क्षेत्रभेटीच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले ॲड. मिलिंद सर्पे यांनी सार्वजनिक ग्रंथालय चळवळ याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमास विद्यालयातील ६० विद्यार्थी उपस्थित होते. या क्षेत्रभेटीतून ज्ञानवर्धक माहिती आम्हास मिळाली अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. ग्रंथपाल मयुरी रामतीर्थकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर आभार ग्रंथालय लिपिक दत्ता हुस्सेकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment