किनवट : 83 किनवट विधानसभा क्षेत्रामध्ये प्रदीप नाईक यांना विद्यमान आमदार भीमराव केराम यांच्याकडून अनपेक्षितरित्या निसरता पराभव पत्करावा लागल्यामुळे, त्यांनी ‘ईव्हीएम’ बाबत शंका उपस्थित करीत नऊ केंद्रावरील फेरमतमोजणीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे. त्यासाठीच्या शुल्कापोटी 4 लाख 24 हजार 800 रुपयांचे शासकीय चलन ही त्यांनी भरले असून, जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांपैकी नाईकांचा हा पहिलाच अर्ज असल्याचे समजते.
इलेक्ट्रानिक व्होटींग मशिन (ईव्हीएम) बाबत संशय घेण्याचे कारण असे कळते की, दि.20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानामध्ये सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी येथील सहा.जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली (भाप्रसे) यांच्या अधिकारातील मिडिया कक्षाने अधिकृतरित्या 01 लाख 62 हजार 804 एवढी घोषित केली होती, ज्याची टक्केवारी 58.42 होती. तसे पत्रही त्यांनी त्यावेळी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठविले होते. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतर मिडिया कक्षाकडून अंतिम मतदानाची आकडेवारी रात्री उशीरापर्यंतही जाहीर करण्यात आली नाही. मात्र, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजित राऊत यांच्यातर्फे जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रातील सकाळी 07 ते सायंकाळी 06 पर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी अधिकृतरित्या घोषित करण्यात आली. त्यात सायं.सहापर्यंत किनवट विधानसभा क्षेत्रात 01 लाख 80 हजार 285 मतदान झाल्याचे नमूद केले होते व त्याची टक्केवारी 64.70 होती. मात्र ही आकडेवारी अंतिम म्हणून जाहीर केली नव्हती. यात दखल घेण्याजोगी बाब म्हणजे सायंकाळी पाच पर्यंतची येथील घोषित आकडेवारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची सहापर्यंतची घोषित केलेली आकडेवारी या एका तासातील मतदान 17 हजार 481 एवढे आहे. यानंतर दुसरे दिवशी गुरूवारी (दि.21) दुपारी 1.45 वाजण्याच्या सुमारास किनवट येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून एकूण मतदानाचा अंतिम आकडा हा 02 लाख 00 हजार 499 असा घोषित करण्यात आला. ज्याची टक्केवारी 71.95 एवढी होते. तसेच यात 01 हजार 998 टपाली मतदानांचा समावेश केलेला नव्हता. या सर्व पार्श्वभूमीवर पराभूत उमेदवार व त्यांच्या समर्थकांच्या मनामध्ये अशी शंका तयार झाली की, केवळ एका तासामध्ये तब्बल 37 हजार 695 मतदान झाले असावे का? झाले असल्यास ज्या ठिकाणी असा मतांचा आकडा फुगला तिथे रात्री उशीरा पर्यंत मतदारांच्या रांगा होत्या का? हे सर्व होऊनही सकाळी सात ते सायंकाळी पाचपर्यंत तुम्ही चार वेळा केवळ अर्ध्या-एक तासात मतदानाची आकडेवारी जाहीर केलीत; तशी उशीरा का होईना तुम्ही त्या दिवशी रात्री अंतिम मतदानाची आकडेवारी घोषित करणे अपेक्षित होते. तसेच जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सायंकाळी सहा वाजेपर्यंतचा घोषित केलेला आकडा व दुसरे दिवशीचा अंतिम आकडा यात तब्बल 20 हजार 214 मतांचा फरक होता. त्यामुळे किनवट मतदारसंघातील 331 केंद्रामध्ये एवढे मतदार सायंकाळी सहानंतर मतदान करण्यासाठी उपस्थित होते का? अशा काही प्रश्नांबाबत संदिग्धता निर्माण झाली. तसेच अंतिम मतदान घोषित करण्यासाठी दुसऱ्या दिवशीची दुपार का उजाडली ? असाही प्रश्न विरोधकांच्या मनात निर्माण झालेला आहे. त्यामुळेच या सर्व शंकांच्या निरसणासाठी प्रदीप नाईक यांनी मतदान केंद्र क्रमांक 15, 16, 47, 318, 240, 288, 289, 251 व 308 अशा एकूण 9 मतदान केंद्रावरील व्ही. व्ही.पॅट यंत्रातील मतदानाची फेरमतमोजणी करावी, अशी मागणी अर्जाद्वारे केली आहे. या बाबत जिल्हा निवडणूक अधिकारी व निवडणूक आयोग काय निर्णय घेतात, या विषयी कमालीची उत्सुकता नागरिकांच्या मनात निर्माण झालेली आहे.
महाराष्ट्रातील परवाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला असून, अनेक पराभूत उमेदवारांकडून निकालाबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. तसेच त्यातील 24 पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमवर संशय घेत पुन्हा पडताळणीसाठी अर्थात फेरमतमोजणीसाठी अर्ज केला असल्याचे समजले. निवडणुकीच्या निकालावर अनेक उमेदवारांनी आपला आक्षेप तर नोंदवलाय; मात्र, नव्याने मतमोजणी करण्याचा निर्णय घेणे आयोगाला शक्य नाही असे जाणकारांकडून समजते. जर एखाद्या उमेदवाराला सर्व मतमोजणी पुन्हा करायचीच असेल, तर न्यायालयातूनच त्यासाठी परवानगी मिळवावी लागते. त्यानंतरच नियमाने पुढची कारवाई होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
No comments:
Post a Comment