किनवट तालुक्यात तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 24 December 2024

किनवट तालुक्यात तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव


किनवट (प्रतिनिधी) : तालुक्यातील तूर पीक सध्या काही भागात फुलोरा तर काही भागात शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. काही दिवसापासून  वातावरणात झालेल्या बदलामुळे त्यावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे तुरीची उत्पादकता प्रभावित होण्याच्या भीतीतून शेतकऱ्यांचे ‘टेन्शन’ वाढले आहे.


किनवट तालुक्यात खरीपातील तूर पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र  6 हजार 627 हेक्टर असून, प्रत्यक्षातील पेरणी 7 हजार 234 हेक्टरवर क्षेत्रावर अर्थात 109.16 टक्के  झालेली आहे. यंदाच्या हंगामात तुरीची लागवड झालेल्या काही क्षेत्रात मर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. बऱ्याच भागात यामुळे तुरीची झाडे उभी वाळून गेली. त्यानंतर आता तुरीचे पीक फुलोरा व शेंगा धरण्याच्या प्रक्रियेत असताना शेंगा पोखरणाऱ्या अळीचा मोठा प्रादुर्भाव झालेला आहे. काही दिवसापासूनचे ढगाळ वातावरण अळ्यांसाठी पोषक ठरत असून, त्यामुळे पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे शेतीतील जाणकारांचे मत आहे.  


सोयाबीन पिकाची काढणी झाल्यानंतर किडीचा हल्ला आता तुरीच्या पिकावर झालेला आहे. तुरीच्या झाडावर कळी तसेच काही ठिकाणी शेंगांना ही अळी पोखरत आहे. शेंगा पोखरल्याने त्यात दाणे न भरता मुकणी तयार होत असते. त्यावर वाढणाऱ्या बुरशीमुळे दाणे कुजण्यासारखेही प्रकार घडतात. अळीचे नियंत्रण करण्यासाठी शेतकरी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात सध्या व्यस्त आहेत.


   तालुका कृषी कार्यालयाने केलेल्या शिफारसीनुसार तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी 5 टक्के  निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्यास शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे.


 


‘‘तुरीचे पीक फुलांवर आले असताना अचानक वातावरणातील बदलामुळे किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे तुरीचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. महागड्या औषधांची फवारणी करण्याचा खर्च मात्र वाढला आहे.’’

          – व्यंकटी चव्हाण, शेतकरी, रोहिदासतांडा



           ‘‘सध्या तुरीवर फुलोरा व शेंगा लागण्याची अवस्था सर्वत्र आहे. त्यावर शेंगा पोखरणारी अळी काही भागात दिसत आहे. यालाच हिरवी बोंड अळी किंवा हरभऱ्यावरील घाटे अळी असेही म्हटले जाते. ही अळी फुले व शेंगाही खाते. त्यामुळे              शेतकऱ्यांनी प्रादुर्भाव झालेल्या तुरीवर कीटकनाशकांची शिफारसीनुसार फवारणी करावी "

           - तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी दिली.


No comments:

Post a Comment

Pages