डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता आदर्शवादी आणि प्रेरणादायी- डॉ. राजेंद्र गोणारकर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 27 January 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता आदर्शवादी आणि प्रेरणादायी- डॉ. राजेंद्र गोणारकर

नांदेड :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी कार्यामध्ये त्यांच्या पत्रकारितेचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. या पत्रकारितेचे स्वरूप आदर्शवादी तसेच नीतिमान होते. म्हणूनच ते प्रेरणादायी होय असे प्रतिपादन ज्येष्ठ माध्यमतज्ञ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यम शास्त्र संकुलाचे संचालक डाॅ. राजेंद्र गोणारकर यांनी आज येथे केले. नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्राच्या वतीने 'डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकपत्रकारितेचे अंतरंग' या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. 


डॉ. आंबेडकर पत्रकारितेकडे का वळले याबद्दल डॉ. गोणारकर यांनी सविस्तर मांडणी केली तसेच या अनुषंगाने मराठी पत्रकारितेच्या स्वरूपाची चर्चा केली. 19 व्या शतकात मराठी पत्रकारितेला सुरूवात झाली. महात्मा फुले यांच्या प्रेरणेने सत्यशोधक पत्रकारिता बहरली. मात्र तरी देखील मराठी पत्रकारितेवर अभिजन वर्गाचेच वर्चस्व होते. या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकर यांच्या पत्रकारितेचा उदय झाला असे  डॉ. गोणारकर यांनी यावेळी नमूद केले.


1920 च्या दशकात डॉक्टर आंबेडकर यांनी आपले सार्वजनिक कार्य सुरू केले. मात्र अभिजन वर्गाच्या ताब्यातील वृत्तपत्रे आणि नियतकालिके आपल्या कार्याला प्रसिद्धी तर देत नाहीतच पण त्याचा विपर्यास करतात असे त्यांच्या लक्षात आले. आपण ज्या वंचित घटकांसाठी कार्य करत आहोत त्यांचे प्रश्न सर्वांसमोर मांडण्यासाठी आपल्या हाताशी वृत्तपत्रे असावी हे त्यांच्या लक्षात आले. म्हणूनच डाॅ. आंबेडकर यांनी 1920 मध्ये मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले असे डाॅ. गोणारकर यांनी यावेळी सांगितले. 


त्यानंतरच्या काळात त्यांनी बहिष्कृत भारत, समता, आणि जनता ही वृत्तपत्रे काढली.1950 च्या दशकात जनता चे नाव बदलून प्रबुद्ध भारत करण्यात आले आणि हे नियतकालिक आजतागायत चालू आहेत. नियतकालिकांच्या बदलत्या नावांमधून डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची दिशा स्पष्ट होते. तांत्रिकदृष्ट्या पहायचे झाले तर  संपादक या नात्याने डॉ. आंबेडकर यांचा फक्त 'बहिष्कृत भारत' याच्याशीच संबंध होता. मात्र उर्वरित सर्व नियतकालिकांचे नेतृत्व त्यांच्याकडेच होते अशी माहिती डाॅ. गोणारकर यांनी यावेळी दिली. 


डॉ. आंबेडकर यांनी आपल्या नियतकालिकांमध्ये दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना अजिबात स्थान दिले नाही आणि या क्षेत्रातील नीतिमत्ता जपली. आपल्या लेखनातून त्यांनी भारतीय समाजाची मूलगामी चिकित्सा केली. अशी चिकित्सा आज देखील आवश्यक आहे. त्यामुळेच त्यांची पत्रकारिता ही अशीच चिकित्सा करणाऱ्या बहुजन पत्रकारितेला आणि पर्यायी माध्यमांना प्रेरणादायी ठरणार आहे असे देखील त्यांनी यावेळी नमूद केले. 


आपल्या व्याख्यानात डॉ. गोणारकर यांनी आंबेडकरपूर्व दलित पत्रकारितेचा देखील आढावा घेतला. डाॅ. आंबेडकर यांच्याआधी गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे, गणेश आकाजी गवई, आणि किसन फागुजी बनसोडे या नेत्यांनी नियतकालिके काढली होती असे त्यांनी उपस्थिताच्या निदर्शनास आणून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. विश्वाधार देशमुख यांनी केले तर वक्त्यांचा परिचय डॉ श्रीनिवास पांडे यांनी करून दिला. डॉ. अभय दातार यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Pages