संविधानात्मक नैतिकता रुजविणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी प्रा. देविदास घोडेस्वार यांचे प्रतिपादन ; 'कल्चरल' ची फुले -शाहू -आंबेडकर- अण्णाभाऊ साठे व्याख्यानमाला :पहिले पुष्प - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 10 January 2025

संविधानात्मक नैतिकता रुजविणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी प्रा. देविदास घोडेस्वार यांचे प्रतिपादन ; 'कल्चरल' ची फुले -शाहू -आंबेडकर- अण्णाभाऊ साठे व्याख्यानमाला :पहिले पुष्प


नांदेड : भारतीय संविधानामुळे भारत हे राष्ट्र म्हणून उदयाला आले. पण संविधानाला अभिप्रेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आपण अद्याप निर्माण करू शकलो नाही. उलट संविधानच नको अशी आत्मघातकी प्रवृत्ती वाढत आहे. फुटीरतेला  टाळून एकात्म राष्ट्र घडवण्यासाठी संविधानात्मक नैतिकता समाजात रुजविणे  ही प्रत्येक भारतीयांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन संविधानाची गाढे अभ्यासक प्रा. देविदास घोडेस्वार (नागपूर ) यांनी केले.

 कल्चरल असोसिएशन नांदेड च्या वतीने  आयोजित दोन दिवसीय फुले- शाहू -आंबेडकर -अण्णा भाऊ साठे व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. व्याख्यानाचा विषय "संविधानात्मक मूल्यांची रुजवणूक आणि आपली भूमिका" हा होता. 

 अध्यक्ष म्हणून माजी शिक्षण संचालक नंदन नांगरे हे उपस्थित होते. तसेच याप्रसंगी रेवनदास लोखंडे, 'कल्चरल' चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गोणारकर, सत्कारमूर्ती पिराजी गायकवाड, डॉ. पंडित सोनाळे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

 प्रा. देविदास घोडेस्वार यांनी आपल्या भाषणात  भारतीय संविधानाची अनन्यता विविध उदाहरणांच्या आधारे त्यांनी स्पष्ट केली. आपल्या देशात भारतीय संविधान हे सर्वोच्च स्थानी आहे. या संविधानाने लोकांचे सार्वभौमत्व मान्य केले आहे. भारतीय लोक ही सार्वभौम, स्वयंशाशित , स्वयंशासक व राजकीय सत्तेचा स्त्रोत आहेत. निवडणुकीतून लोक आपले शासक निवडत नाहीत तर प्रतिनिधी निवडतात. पण दुर्दैवाने प्रतिनिधींना आपणच सरकार 

आहोत, असे वाटत आहे.  संविधानाला हातही न लावता त्यातील मूल्यांची हत्या करून संविधान बदलण्याची कृती केल्या जात आहे. याकडेही त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात लक्ष वेधले. 

 अध्यक्षीय समारोप करताना माजी शिक्षण संचालक नंदन नांगरे म्हणाले, संविधानातील तरतुदी नुसत्या वाचून समजून उपयोग नाही. त्या प्रत्यक्षात येण्यासाठी आपली जबाबदारी महत्त्वाची आहे. संविधान कुण्या एका वर्गासाठी नाही. संविधान सर्व भारतीयांसाठी आहे. याचा जणू लोकांना विसर पडला आहे. हा विसर गडद व्हावा, यात काही लोकांचे हितसंबंध गुंतले आहेत. त्यामुळे संविधानाच्या विटंबना सारखे प्रकार घडत आहेत. असेही ते म्हणाले.


यावेळी सामाजिक क्षेत्रात नि:स्पृहपणे काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यास दिला जाणाऱ्या स्मृतीशेष प्राचार्य अशोक नवसागरे  स्मृती पुरस्काराने ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते पिराजी गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप शाल,मानचिन्ह व रुपये पाच हजार रोख रक्कम असे होते.

 प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते फुले -शाहू- आंबेडकर- अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. 

 बोधीवृक्षाच्या रोपट्यास पाणी देऊन व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. स्वागत गीत सुजाता शिरसे यांनी सादर केले. तर संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन एस. जे. शिरसे यांनी केले. 

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ  राजेंद्र गोणारकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्चरल चे सचिव डॉ.  विजयकुमार माहुरे यांनी केले तर मारोतराव धुतुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Pages