छत्रपती शिवरायांचा महिलांविषयक दृष्टिकोन आजही मार्गदर्शक - ॲड.वैशालीताई डोळस - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 21 February 2025

छत्रपती शिवरायांचा महिलांविषयक दृष्टिकोन आजही मार्गदर्शक - ॲड.वैशालीताई डोळस


 किनवट  (प्रतिनिधी) :  ‘‘ छत्रपती शिवरायांच्या काळात महिलांना विशेष सन्मान आणि सुरक्षितता देण्यावर भर दिला जात असे. त्यांनी आपल्या राज्यात महिलांसाठी एक आदर्शवत न्यायसंस्था प्रस्थापित केली होती. त्यांचा महिला सन्मानाचा दृष्टिकोन आजच्या समाजासाठीही प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. सध्या असा आदर्श दृष्टीकोन असलेली पिढी घडविण्यासाठी योग्य ज्ञानाने सक्षम अन्‌ सुसंस्कारित जिजाऊ समाजात तयार होणे गरजेचे आहे’’ असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्त्या ॲड.वैशालीताई डोळस यांनी केले.


     बुधवारी (दि.19) शिवजयंती निमित्त कलावती गार्डन येथे आयोजित "छत्रपती शिवाजी महाराजांचा महिला विषयक दृष्टिकोन" या विषयावर मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ.पूनम तौर या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार भीमराव केराम यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना श्रीमती डोळस म्हणाल्या की, "शिवरायांचे कार्य आणि विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी असे उत्सव आवश्यक आहेत. शिवकालीन स्त्रिया केवळ रणांगणावरच नव्हे, तर सामाजिक सुधारणांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावत होत्या. आजच्या स्त्रीनेही शिक्षण व आत्मनिर्भरतेच्या मार्गाने प्रगती करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.


प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना आ. भीमराव केराम यांनी प्रथम उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचे थोर विचार महाराष्ट्राचा ‘श्वास’ असून, शिवजयंती साजरी करणे ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची निशाणी आहे. शिवरायांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारलेली आदर्श राज्यव्यवस्था निर्माण केली. लोककल्याणकारी राजवट घडवत त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या पराक्रमाने संपूर्ण राष्ट्राला प्रेरणा दिली. त्यांच्या विचारांचा प्रसार होणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


दरम्यान, याच कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच शिव जयंती निमित्त आयोजित विविध स्पर्धाचे पुरस्कार वितरण आ. केराम व वैशाली डोळस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पृथ्वीराज देशमुखे या चिमुकल्याने शिवाजी महाराजांच्या जोशपूर्ण घोषणा देऊन वातावरण प्रभावित केले. छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने सकाळी विद्यार्थ्यांसाठी ‘वक्तृत्व’ आणि ‘चित्रकला’ स्पर्धा घेण्यात आली. दरम्यान, शहरातील मुख्य  मार्गावरून तरुणाईने घोषणा देत मोटारसायकल रॅली काढली. त्यानंतर छत्रपती शिवाजी चौकात महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पुढे लेझीम पथकाच्या सादरीकरणासह भव्य मिरवणूक काढण्यात आली. जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 61 दात्यांनी रक्तदान केले. सायंकाळी 6:30 वाजता 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या विशेष नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले.


      यावेळी माजी नगराध्यक्ष इसाखान, व्यंकटराव नेम्मानीवार, साजिदखान, श्रीमती बेबीताई नाईक,  अनिल पाटील कन्हाळे, डॉ.रोहिदास जाधव, प्रा. किशन मिरासे, अशोक नेम्मानीवार, बंडू नाईक, दत्ता आडे, वैजनाथ करपुडे पाटील,  ॲड.  राहुल नाईक, गजानन पाटील कोल्हे,  ॲड. अर्चित नाईक, बालाजी बामणे, अनिल मोहिते, भुजंगराव पाटील, सागरताई शिंदे, संतोष मरसकोल्हे, फुलाजी गरड, प्रमोद पोहरकर, किरण ठाकरे आदींची उपस्थिती होती. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती.  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. रामप्रसाद तौर यांचेसह शिवजयंती समितीचे अध्यक्ष विक्रम पवार, सचिन कदम, अरविंद कदम, आकाश इंगोले, रितेश मंत्री, सारंग पवार, अमोल सोमवंशी  विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. दगडू भरकड यांनी केले तर आभार मराठा सेवा संघाचे प्रा. शिवराज बोकडे यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Pages