नागपुर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी 9.30 वाजता पवित्र दीक्षाभूमीला भ्ोट दिली. यावेळी त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशावर पुष्प अर्पण करून तथागत गौतम बुध्दाच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती (दीक्षाभूमी)चे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली तसेच बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती सोपवा, दीक्षाभूमीसाठी अतिरीक्त जागा देण्यात यावी, या आशयाचे निवेदन दिले.
पंतप्रधान मोदी नियोजित वेळेत म्हणजे सकाळी 9.30 वाजता दीक्षाभूमीत पोहोचले. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशावर पुष्प वाहिले आणि वंदन केले. त्यानंतर तथागत गौतम बुध्द यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण्ा करून दीप प्रज्वलन केले. यावेळी ससाई यांनी त्रिशरण पंचशील म्हटले. यानंतर दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे अध्यक्ष भदंत सुरेई ससाई यांनी पंतप्रधान मोदी यांना शाल, श्रीफळ आणि दीक्षाभुमी स्तुपाची प्रितिकृती भेट देवून त्यांचे स्वागत केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुध्द आणि त्यांचा धम्म ग्रंथ भेट दिले.
निवेदनात म्हटले की, बोधगया हे जगातील सर्व बौद्धांचे पवित्र स्थान आहे. या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांना संबोधी प्राप्त झाली होती. या महाविहाराची निर्मिती सम्राट अशोक यांनी केली होती. तेथील 1949 बीटी ॲक्ट रद्द करून महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती द्यावे. तसेच दीक्षाभूमीत येणाऱ्या अनुयायांसाठी जागा अपूरी पडत आहे. भविष्याचा विचार करता माता कचेरी, कॉटन रिसर्च सेंटर येथील 21 एकर जागा दीक्षाभूमीला देण्यात यावी, अशी निवेदनाव्दारे विनंती केली. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, डॉ. राजेंद्र गवई, आनंद फुलझेले, एन.आर. सुटे, दादाराव दाभाडे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment