आंबेडकरी उजेडाची सौंदर्य छाया - यशवंत मनोहर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 25 March 2025

आंबेडकरी उजेडाची सौंदर्य छाया - यशवंत मनोहर



             महाराष्ट्रातील आंबेडकरी सौंदर्यशास्त्राचे जनक आणि गाढे अभ्यासक यशवंत मनोहर हे आमच्यासाठी आंबेडकरी साहित्यातील बापमाणूस तर आहेतच पण सर्वश्रेष्ठ इहवादी विचारवंत आणि बुद्धीवादी वाङमयतत्वज्ञ म्हणून आंबेडकरी उजेडाची सौंदर्य छाया सतत धरुन ठेवण्याची किमया साधणारा करुणेचा काळीजपिसारा होय. आंबेडकरी ही वैश्विक संज्ञा आहे. त्यामुळे आंबेडकरी प्राणतत्वापासून मिळणारी प्रकाशलाट आम्हाला उजेडोत्सवात न्हाऊ घालते. आंबेडकरी या संज्ञेची उजेड हीच एकमेव व्याख्या आहे. आंबेडकरी ही एक संस्कृती आहे. यावर काही तथाकथित विद्वानांचे दुमत आहे. कारण अशी कोणतीही संस्कृती अस्तित्वात नाही आणि नव्हती. तसेच ती निर्माण होण्याची कदापिही शक्यता नाही. आंबेडकरी संस्कृतीला अर्थ आणि आशय नाही. परंतु हे खरे नाही. आंबेडकरी संस्कृती ही या देशाची मूळ संस्कृती आहे. तिच्यावर आक्रमणे झाली. तिची नावे बदलली. माणसं बदलली. स्वातंत्र्याला पारखी झाली. पण ही संस्कृती कायम होती. माणसाला माणूसपण बहाल करणारी ही संस्कृती आहे. ही संस्कृती या देशात अत्यंत प्राचीन काळापासून नांदत होती. अंधाराला उजेडाची पायवाट दावणारी ही संस्कृती आहे. या संस्कृतीत माणसाचे लोकजीवन आहे, कला आहे, भाषा आहे, साहित्य आहे, आहार विहाराचे शास्र आहे. अगदी वैविध्यपूर्णतेने नटलेली ही माणसांची संस्कृती आहे. बुद्धाने निर्माण केलेल्या संस्कृतीचेच हे नाव आहे. या साहित्य संस्कृतीचे दायाद यशवंत मनोहर बनले आहेत. ही केवळ शब्दांची संस्कृती नाही. अज्ञानरचना कोसळवून टाकणारी ज्ञानसंस्कृती आहे. संघर्षाची गाथा आहे. क्रांतीचा निरोप फुलविणारे निखारे आहेत. एवढे असे असूनही 

साहित्यातील प्रचंड समजूतदारपणा आणि कारुण्य त्यांच्या अनन्य प्रज्ञाशील प्रतिभेची वैशिष्ट्ये आहेत. आंबेडकरी साहित्य आणि सांस्कृतिक संविधानाचे प्रास्ताविक त्यांनी मांडले आहे. ही सर्जनशीलता पुढे फळाला येणारच आहे. ते या शब्दांचे नवे विश्व निर्माण करणारच आहेत. हे नवे आंदोलन आहे आणि ते जन्माला घालीत आहेत. सुरुवातीलाच या यशवंत मनोहर नावाच्या आंदोलनाला मी अभिवंदन करतो.


             मनोहर सरांची साहित्य संपदा खूप मोठी आहे. कवितासंग्रह, समीक्षाग्रंथ, प्रवासवर्णन, वैचारीक निबंध, तत्वज्ञान, कादंबऱ्या, ललितनिबंध आदींचा पसारा खूप मोठा आहे. यातून जीवनाचे सौंदर्यशास्त्र मांडले. त्यांनी सौंदर्याचीही पुनर्रचना केली. जीवनासंबंधीचे तत्वज्ञान म्हणजे जीवनदृष्टी आणि जीवनदृष्टी म्हणजे जीवनाची सौंदर्यदृष्टी असे ते मानतात. त्यांनी बुद्धाच्या नीतीचे, बुद्धीवादाचेही सौंदर्यशास्त्र मांडले. दाहक सत्याचे सौंदर्य लिहिले. कवितेसह आंबेडकरवादी गझलेचे सौंदर्यशास्त्र लिपीबद्ध केले. साहित्यातील सौंदर्य अधोरेखित केले तसेच सौंदर्याची संस्कृती कशी असावी यावरही भाष्य केले. खरे तर ह्या प्रकाशशलाका बाबासाहेबांपासून निघणारा उजेडाच्या सौंदर्याचा किरणोत्सव आहे. नवा जन्म होत आहे या प्रक्रियेचा उजेडोत्सवही आहे. जीवनाचा विचार म्हणजे माणसांमधील संबंधाचा विचार असतो.‌ नीतीचा उगम या संबंधांच्या निश्चितीशी बांधलेला असतो. या संबंधीची रचना कशी असावी या प्रश्नाची वेगवेगळी उत्तरे परस्परभिन्न त्याहून परस्परविरोधी संबंधांच्यानुसार घडलेली असतात. हे सरांच्या साहित्यात सर्वदूर आढळते. ही सौंदर्याचीच पुनर्रचना होय. या संदर्भात सौंदर्याचा अनुभव वा प्रत्यय सरांना वाचताना येतो. भावनेपेक्षा जीवनदृष्टीशी तसेच व्यक्तित्वाच्या निरंतर पुनर्रचनेशी सौंदर्याचा संबंध प्रस्थापित होत असतो. ही पुनर्रचना माणसाला त्याच्या सौंदर्यवृत्तीला अधिक गतिमान, समृद्ध, विवेकी बनवित असते. अधिक प्रज्ञाशिलताही प्रदान करीत असते. हा एक अनुभव असतो. हा अनुभव नवजन्माचा, मनाच्या पुनर्रचनेच किंवा नव्याने अस्तित्व उगवण्याचा असतो. हा विश्वकरुणेच्या विलसनाचा एक क्षण असतो. माणसाच्या व्यक्तित्वातील सामंजस्याच्या कक्षा असीम होण्याच्या, प्रभल्भ तसेच नितळ आणि निकोप होण्याचाही हा क्षण असतो. तो स्वतःची व्याप्ती किंवा क्षितीज विस्तारित नेतो. हा क्षण पुढच्या अनेक क्षणांना आपल्यासारखे बनविण्याचा प्रयत्न करतो. त्या क्षणांनाही प्रज्ञानी, शहाणे आणि सम्यक करीत असतो. यातूनच उजेडाचे सौंदर्य जन्म घेते. हे अनेक क्षण उजेडाच्या सौंदर्याची छत्रछाया निर्माण करतात. यशवंत मनोहर हे या सौंदर्यछायेचे छत्रपती झाले आहेत.


              वयाच्या पंधराव्या वर्षी यशवंत मनोहर सरांनी भावभावनांचे समायोजन किंवा प्रगटीकरण, त्यामुळे होणारा त्रास, वयानुसार आयुष्यात येणारी वादळे समजून घेणे क्रमप्राप्त होते. या वयात कुठेही न मावणाऱ्या, न थांबणाऱ्या मुक्त आणि अनावर भावनांचा महापूरच येत असतो. तो त्यांनी अनुभवला आहेच पण ते वाहवत गेले नाहीत. त्यांना बांधून ठेवण्याच्या वेड्या नादात त्यांनी शब्दांशी नाते जोडले. शब्दांच्या सागरांचे बांधकाम त्यांनी केले. या शब्दांवर माझ्यासह  महाराष्ट्रातल्या सुज्ञ वाचकांनी कोणतेही किनारे नसलेले प्रेम केले. अभिरुचींचे कोंडवाडे सगळ्यात आधी तोडून टाकल्यामुळे सरांचे हे मुक्तपण सन्मानाने स्वीकारले. जगात नितळ मनाने जगणे सोपे नसते. असे ज्यांना जगायचेच नसते ते आपल्या विरोधी बाकांवर खुशाल जाऊन बसतात. ते कितीही विरोधात उभे राहिले तरी मनोहरांचे मन - सर्वच भिंती तोडून बाहेर पडलेले मन शोषितांच्या बाजूनेच बोलत राहिले. जे लोक सरांच्या मनाच्या विरोधात उभे राहिले ते आपसूकच शोषितांच्या विरोधी आणि शोषकांच्या बाजूने उभे राहिले. खरे तर या आधीच त्यांना जगण्याचा शोध लागलेला होता. आपल्या घरादारावर आणि शरीरावर उजेडाची फुले लगडत आहेत ही सुंदर भावना जन्म घेत होती. सर लहानपणापासूनच दिसायलाही सुंदर आणि सौंदर्याचे पर्याय असलेले असे आहेत. गतीशुन्यता, दयनीयता, काळोखाचे प्रतल या सर्वांनाच भेदून उजेडाचा कॅनव्हास उभा केला. सर हे एक सम्यक विज्ञानशील, प्रज्ञा - प्रतिभावंत, बुद्धीप्रामाण्यवादी साहित्यिक नसते तर ते जगप्रसिद्ध चित्रकार म्हणून रंगरेषांबरोबर आयुष्यभर खेळत बसले असते. किती पैसा कमविला असता, ही बाब अलहिदा! मात्र बुद्धाला जसा गृहत्याग करायचा होता आणि सत्य शोधायचे होते म्हणून बुद्ध काही चक्रवर्ती सम्राट होऊ शकला नाही. मनोहरांनी मात्र मराठी साहित्याच्या कॅनव्हासवर उजेडाची फुले रंगवली आणि कधीही नाहीसे न होणाऱ्या सौंदर्याची निर्मिती केली. सौंदर्याचेही महाघरही बांधून काढले.

       

         साहित्याप्रती त्यांना अपार कृतज्ञता आहे. ते म्हणतात, साहित्याने मला नवा जन्म दिला. खूप नवनवे जन्म दिले. माझ्या साठी आणि माझ्या कुटुंबासाठी ही प्रक्रिया नवीनच होती. साहित्याने सर्जनात रमणारे मन दिले. आपण सत्य सांगतो आहोत याचा अपूर्व आनंदही दिला. आणि सत्य सांगण्याचा निर्भयपणाही दिला. साहित्याने माझ्या श्वासांना अर्थपूर्ण प्रयोजन दिले. इतर जे सुचले ते लिहून ठेवण्यासाठी मात्र येणाऱ्या दिवसाची वाट बघितली. त्यामुळे कंगाल जगणे हे सतत स्वप्नामागे धावायला शिकले आणि जगण्याचा सतत हुरुप वाढला. निष्प्रयोजनतेची बाधा मला कधीही झाली नाही, आपण कशासाठी जगायचे असा प्रश्न मला कधीही पडला नाही. साहित्याने मला जगण्याचा एक सुंदर उद्देश दिला . लेखनाच्या धुंदीत जगण्याचा ध्यास दिला. मला महत्वाचे पुरस्कार मिळाले, सन्मान मिळाले हे खरे आहे. पण मी पुरस्कारांसाठी, सन्मानासाठी कधीच लिहिले नाही. मी कोणालाही काहीही मागितले नाही आणि प्रमाण मानलेल्या मूल्यदृष्टीत जे बसले नाही, त्याचा स्विकारही मी केला नाही. मी अशा खूप गोष्टींना नकारही दिले. हा न वाकणारा कणा मला साहित्याने दिला. सर्वसमावेशक दृष्टी दिली. माणसांभोवतीच्या बंधनांचा कृत्रिमपणा सांगितला. तत्वज्ञानातील, धर्मांमधील आणि साहित्यातील असत्यांच्या डोंगरावर फुल्या मारायला शिकविले. खोटारड्या महोत्सवांची चिकित्सा करायला आणि शोषणाच्या सर्व राहुट्यांना आग लावायला सांगितले. साहित्याने मला अपार प्रेम करणारी माणसे दिली आणि कष्टांच्या डोंगरांना वंदन करायलाही शिकविले. असे ते प्रामाणिकपणे सांगतात. या डोंगरांच्या मधून उजेडाची पहाट उगवत राहिली. दुपार झाली नि संध्याकाळ झाली तरी ती पहाट उजेडाचे सौंदर्य स्वतःभोवती लपेटून घेऊन पहाटच झाली पुन्हा पुन्हा उगवत राहण्यासाठी. या पहाटेने नेहमीच अंधाराचे किनारे उध्वस्त केले. अंधाराला पूर्णपणे गिळत जाणाऱ्या उजेडपौर्णिमेचे नेतृत्व केले.


         यशवंत मनोहर हे बुद्धिप्रामाण्यवादी साहित्यिक म्हणून सर्वदूर परिचित आहेत. हा वाद साहित्याला कोणत्याही दृष्टीने मर्यादांमध्ये बांधत नाही. माणूस हाच त्याचा एकमेव विषय असतो आणि या माणसाच्या सर्वांगीण अस्तित्वाचा स्वीकार आणि गौरवच हा वाद करीत असतो. माणसांमधील गुणांचा आणि दुर्गुणांचाही वेध घेतांना साहित्यिकांनी किंतु परंतु ठेवू नये. बुद्धिप्रामाण्यवाद हे एक मूल्यच आहे. ते विज्ञानशीलता, इहवाद यांच्या संबंधी वर्धित होते. ते विविधतेला मानवी सौहार्दाने गुंफून ठेवते. या संबंधातील ऐक्य आणि परस्पर सद्भावना या विविधतेचे सौंदर्य वृद्धिंगत करीत असतात. हे सौंदर्य सत्याचे सौंदर्य असते. चैतन्यवाद, दैववाद, अध्यात्म आणि अलौकिकता या सर्व गोष्टी माणसाला सत्यापर्यंत पोहचू देत नाहीत. त्याची गाठच पडू देत नाहीत. ते सर्वच असत्याला सत्य आणि भ्रमाला वास्तव मानण्याला बाध्य करतात. त्यामुळे अवास्तववादी साहित्य जन्माला येते. ही सर्वच यंत्रणा माणसाच्या फसवणुकीची, खोट्या सत्ताकेंद्रांनी सजवलेली यंत्रणा असते. ही यंत्रणा साहित्यिकाची प्रतिभा उध्वस्त करुन टाकते. असा साहित्यिक त्या यंत्रणेचा गुलाम बनतो. बुद्धिप्रामाण्यवाद आणि विज्ञानशीलता हेच खऱ्या साहित्यिकाचे क्षितीज होय. म्हणूनच बुद्धिप्रामाण्यवाद हा यशवंत मनोहर सरांच्या एकूण साहित्याचा श्वास आहे. ते साहित्यिकांना इशारा देतात की, साहित्यिकांच्या स्वातंत्र्याला कोणत्याही हितसंबंधाची चौकट नसते. त्याचे मन परतंत्र नसते म्हणूनच खरा प्रतिभावंत साहित्यिक आपल्या स्वातंत्र्यनिष्ठा निर्माण करीत असतो. चौकटविहिनता हीच त्याची भूमिका असणे गरजेचे असते. या भूमिका भक्तांना आंधळेपणाचा त्याग करायला सांगतात. तसे झाले तर इथे स्वातंत्र्याची निर्मिती होते. ही निखळ उजेडाचीच निर्मिती होते. या स्वातंत्र्याच्या प्रतितीला व उन्नयनाला सौंदर्याची प्रतिती म्हटले जाते. हे सौंदर्य सर्वदूर पसरत जाते. अनेकजण उजेडाचे उपासक बनत राहतात. ते आंधळे उपासक नसतात. ते चिकित्सक असतात. विधायकता आणि विघातकता यांत फरक करतात. त्यांनी खोटेपणाची भूमिका त्यागलेली असते. ही त्याची भूमिका माणसाच्या उजेडमयतेचीच असते. सौंदर्य याच क्षितीजातून उगवत असते.


      आजच्या राजकीय स्थितीगतीवरुन सरांचं मन अगदी विषण्ण होते आहे. परिस्थिती हाताबाहेर जात आहे. वैचारिक वाताहत मोठ्या प्रमाणावर होत आहे. वाताहतीमुळेच पायाखाली सुरुंग आणि माथ्यावर आगीचा ढग ओथंबून आहे‌. सर्वत्र सामाजिक आणि नैसर्गिक पर्यावरण उत्साहानं जाळलं जात आहे. काही निळे पक्षी रंगांतर करून भगवे होत आहेत. सूर्यकिरण अंधाराशी समरस झले आहेत आणि दिवस उगवण्याची चांगली प्रथा बंद होते आहे. हे अत्यंत अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. ज्या शब्दातून सूर्यांगण पिसारले पृथ्वीवर तो शब्द माझा आहे. परंतु माझ्या डोळ्यातून अंतरिक्षाएवढा अश्रू का उगवला? शेतात आपण चांदणं पेरतो आणि संकटं कशी उगवतात? असे सवाल ते काळाला करताहेत. पण ते हताश होऊन बसत नाहीत. ते आजही कोणत्याही मर्यादा नसलेले लढवय्ये योद्धे आहेत. म्हणूनच वाताहतीच्या निर्मूलनाची गरज व्यक्त करीत आहेत. राजकारणाच्या हत्येचे सर्व पुरावे बौद्धिक अंध सोडले तर सर्वांनाच दिसत आहेत. ही हत्या आपण जाहीर करायचीही आहे आणि राजकारणाला नवा जन्मही आपणच द्यायचा आहे. कालवरची राजकारणाची व्याख्या राजकारणाची नव्हतीच. राजकारणाची अचूक व्याख्या करण्यासाठी आधी अचूक राजकारण निर्माण करता यायला हवे, असे ते म्हणतात. हे करण्यासाठी आपल्याला आपलं रूपांतर काटेकोरपणे  संविधाननीतीतच करून घ्यावं लागेल. बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञानी आपल्याजवळ आहेत आणि जगातील अनन्य संविधानही आपल्याजवळ आहे. गगनभेदी विज्ञाननिष्ठा,अतुल्य बुद्धिप्रामाण्य आणि समतेचे असीम अंतरिक्ष आपल्याजवळ आहे. पण विषारी राजकीय पर्यावरण मला आणि तुमच्यासारख्या असंख्य सद्विवेकवाद्यांना मोठा धक्का देत आहे, अशी त्यांची धारणा झाली आहे. हा आपल्यातील सत्याच्या आणि सलोख्याच्या सर्वमयतेच्या अग्निपरीक्षेचा काळ आहे आपण या अग्निपरीक्षेत पासच होऊ हा निर्वाणीचा,अपूर्व आणि  कृतिमय निर्धारच आपला हात संविधानविजयाच्या हातात सन्मानानं देऊ शकतो. हा पुढील जगण्याचा उद्देशच आहे. यासाठी आंबेडकरी साहित्याचे सांस्कृतिक संविधान आता लिहावयाचे आहे. म्हणूनच वर्षांच्या या योद्धाचे अभिष्टचिंतन करतो, अधिकाधिक जगण्याच्या हक्काला अभिवंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद!


      - प्रज्ञाधर ढवळे, नांदेड

No comments:

Post a Comment

Pages