छत्रपती संभाजीनगर विमानतळावर भव्य बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना – शांती, अहिंसा आणि बंधुत्वाचा संदेश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 28 March 2025

छत्रपती संभाजीनगर विमानतळावर भव्य बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना – शांती, अहिंसा आणि बंधुत्वाचा संदेश

छत्रपती संभाजीनगर – २८ मार्च २०२५ हा दिवस शहराच्या ऐतिहासिक वारशात नव्या अध्यायाची भर घालणारा ठरला. छत्रपती संभाजीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात १५.५ फूट उंच, अखंड बेंगळोरी ग्रॅनाइटमध्ये कोरलेल्या अभयमुद्रा असलेल्या बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात पार पडली. हा सोहळा केवळ मूर्ती स्थापन करण्यापुरता मर्यादित नव्हता, तर जगभरात शांती, अहिंसा आणि बंधुत्वाचा संदेश देणारा ऐतिहासिक क्षण ठरला.


मंत्र्यांच्या हस्ते भव्य लोकार्पण


या भव्य सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री मा. संजयजी शिरसाट यांच्या हस्ते बुद्धमूर्तीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री मा. उदयजी सामंत, बहुजन कल्याण मंत्री मा. अतुलजी सावे,मनपा आयुक्त जी श्रीकांत, तसेच अनेक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि बौद्ध भिक्खू संघाच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.


धम्मदेसना आणि प्रतिष्ठापना पूजन


या मंगलप्रसंगी पूज्य भदंत बोधीपालो महाथेरो व भिक्खू संघाच्या वतीने प्रतिष्ठापना पूजन व धम्मदेसना आयोजित करण्यात आली. शेकडो उपासक-उपासिकांनी बुद्ध वंदनेत सहभागी होत या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा मान मिळवला.


बुद्धमूर्ती स्थापनेमागील संकल्पना आणि प्रयत्न


छत्रपती संभाजीनगर हे जगभरात बौद्ध संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. अजिंठा-वेरूळ लेण्यांमधून बौद्ध संस्कृतीचा वारसा दिसतो, मात्र विमानतळावर येणाऱ्या पर्यटकांना शहराची ही ओळख प्रथमदर्शनी मिळावी, यासाठी बुद्धिस्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरस अँड ट्रेडर असोसिएशन (बीमटा) संघटनेच्या पुढाकाराने ही संकल्पना साकारण्यात आली.


बुद्धमूर्ती स्थापनेसाठी अनेक महिन्यांचे परिश्रम घेतले गेले. ११ जानेवारी २०२३ रोजी प्रस्तावाला अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर, तेलंगणातील आलागट्टा येथे ही मूर्ती घडवण्यात आली. अखेर ५ मे २०२३, बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी मूर्ती विमानतळावर आणण्यात आली, आणि २८ मार्च २०२५ रोजी तिचे भव्य लोकार्पण करण्यात आले.


शांती, अहिंसा आणि जागतिक बौद्ध संस्कृतीचा सन्मान


ही प्रतिष्ठापना केवळ एक वास्तुशिल्प नाही, तर बौद्ध तत्त्वज्ञानाचा जागतिक स्तरावर प्रचार करणारी प्रेरणादायी घटना आहे. विमानतळावर आलेल्या प्रत्येक प्रवाशाला बुद्धाचे विचार आणि शांतीचा संदेश याठिकाणी जाणवेल. बुद्धिस्ट इंडस्ट्रियल असोसिएशनच्या पुढाकाराने साकार झालेला हा प्रकल्प संपूर्ण जगाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे.


सन्माननीय उपस्थिती


या भव्य सोहळ्यात मिलिंद थोरात, दुशांत आठवले, मिलिंद बागुल, बाळासाहेब पठारे, अशोक भातपुडे, सुभाष मुदगावकर, प्रवीण कुमार वसाते, सिद्धार्थ जाधव, सूर्यकांत कोटकर, रामचंद्र पठारे, सुभाष मोरे, विनोद अवसरमल, प्रमोद राऊत, संदीप केदारे आदी मान्यवर उपस्थित होते.


छत्रपती संभाजीनगरचा ऐतिहासिक गौरव वाढला


बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना छत्रपती संभाजीनगरच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवात भर घालणारी आहे. ही मूर्ती आता शहराच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनली असून, भविष्यात बौद्ध पर्यटनाच्या दृष्टीनेही ती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


"बुद्धं शरणं गच्छामि" या मंत्राचा नाद आसमंतात घुमत असताना, संपूर्ण सोहळ्याचा उत्साह आणि पवित्रता या क्षणाला अजरामर करून गेला!

No comments:

Post a Comment

Pages