हिंसेचे विचार वेळीच रोखा अभिनेता कैलास वाघमारे ; नागसेन फेस्टीव्हलचे जल्लोषात उद्घाटन तीन दिवस चालणार विचारांचा महोत्सव - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 28 March 2025

हिंसेचे विचार वेळीच रोखा अभिनेता कैलास वाघमारे ; नागसेन फेस्टीव्हलचे जल्लोषात उद्घाटन तीन दिवस चालणार विचारांचा महोत्सव


छत्रपती संभाजीनगर : जात, पात, धर्म काहीही न मानता केवळ माणूस म्हणून माणसाकडे प्रत्येकाने पाहिले पाहिजे. आज सगळीकडे हिंसक घटना घडत आहेत. हा विचार नेमका कुठून येतो. हे शोधले पाहिजे. हिंसेचा विचार रोखण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचाराची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेता कैलास वाघमारे यांनी केले. 


पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी- माजी विद्यार्थ्यांद्वारे २८ ते ३० दरम्यान आयोजित नागसेन फेस्टिव्हलचे उद्घाटन पद्मश्री तथा ज्येष्ठ छायाचित्रकार सुधाकर ओलवे यांच्या हस्ते लुम्बिनी उद्यानात मोठ्या उत्साहात शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी झाले. यावेळी अभिनेता वाघमारे, ज्येष्ठ चित्रकार शुभा गोखले, सेवानिवृत्त सहायक पोलिस महानिरीक्षक यशवंत व्हटकर, चित्रकार संजीव सोनपिंपरे, प्राचार्य सुनील वाकेकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संयोजन समितीचे सचिन निकम यांनी नागसेन फेस्टिव्हलच्या आठ वर्षांच्या प्रवासाची माहिती देत पाहुण्याचा परिचय करून दिला. प्रास्ताविकात सिद्धार्थ मोकळे यांनी फेस्टिव्हलच्या माध्यमातून नागसेनवनात शिकलेल्यांना जोडण्याचा हा अभिनव उपक्रम आहे. या माध्यमातून देशविदेशातील मिलिंदचे विद्यार्थी जोडले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. उद्घाटक पद्मश्री सुधाकर ओलवे म्हणाले, आपण स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण केलेली असतानाही दलीत समाजाला आजही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समाजातील एक वर्ग अतिशय हलाखीचे जीवन जगत आहे. या वर्गाच्या हालअपेष्ठा टिपण्याचे काम छायाचित्रांच्या माध्यमातून केले आहे. कोरोनाच्या काळात स्वच्छता कामगारानी केलेलं कार्य अतिशय महत्त्वाचे होते. या वर्गाच्या समस्या कोण सोडविणार? त्याच्या जगण्याच्या हक्काकडे केव्हा लक्ष वेधले जाणार असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला. चित्रकार संजीव सोनपिंपरे यांनीही मनोगत व्यक्त केले. उद्घाटन समारंभाला विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पुरस्काराने मान्यवर सन्मानित 


उद्घाटन सोहळ्यात मिलिंद गौरव पुरस्काराने सेवानिवृत्त उपप्राचार्य के. एन. बनसोडे यांना तर मिलिंद सन्मान पुरस्काराने सेवानिवृत्त प्राचार्य तुकाराम मगरे यांना मान्यवरच्या हस्ते सन्मानित केले. यावेळी प्राचार्य मगरे यांनी मनोगत व्यक्त केले. 

 चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

 नागसेन फेस्टिव्हलमध्ये सुधाकर ओलवे यांनी टिपलेल्या उत्तमोत्तम छायाचित्रांचे प्रदर्शन लुम्बिनी उद्यानातील सभागृहात लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटनही मान्यवरच्या हस्ते करण्यात आले.




No comments:

Post a Comment

Pages