छत्रपती संभाजीनगर,दि.७ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त आयोजित 'वाचन सप्ताह’चे आज उदघाटन सोमवारी (दि. सात) करण्यात येणार आहे.
या निमित्त ७ ते १४ एप्रिल दरम्यान भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या महोत्सवाची सुरुवात ७ एप्रिल रोजी ’वाचन सप्ताह’ उद्घाटनाने करण्यात येईल. यावेळी प्रा.श्रीधर नांदेडकर यांचे ’वाचन संस्कृती’ या विषयावर व्याख्यान होईल. तर ८ एप्रिल रोजी ’काव्यवाचन’ स्पर्धा घेण्यात येणार आहे. ९ एप्रिल रोजी ’रक्तदान’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त प्रा.राहुल कोसंबी यांचे महात्मा फुले सभागृहात व्याख्यान होणार आहे. यावेळी प्रा.कोसंबी हे ’महात्मा फुले यांचे समाज परिवर्तनाचे प्रारुप’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री मा.ना.संजय शिरसाठ यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.११) सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. ’मेळा पुस्तकांचा...समृद्ध वाचन संस्कृतीचा’ हे ग्रंथमहोत्सवाचे ब्रिद असून पहिल्यांदाच विद्यापीठात अशा प्रकारचा ग्रंथ महोत्सव होत आहे. ११ ते १४ एप्रिल दरम्यान दिवसभर प्रदर्शन सुरु राहिल. १२ एप्रिल रोजी ’आंबेडकरी जलसा’ होणार आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. याच दिवशी सकाळी सहा ते रात्री बारा या दरम्यान ’सलग १८ तास वाचन’ हा उपक्रम ज्ञानस्त्रोत केंद्राच्या वाचन कक्षात राबविण्यात येणार आहे. तर १३ एप्रिल रोजी प्रख्यात शाहीर नंदेश उमप यांच्या शाहिरीचा कार्यक्रम नाट्यगृहात होईल. या महोत्सवाचा समारोप भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी होणार असून. या दिवशी सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात येणार आहे. विद्यापीठ गेटपासून ही मिरवणूक ११ वाजता नाटयगृहात पोहचेल. यानंतर मुंबई विद्यापीठातील डॉ.वंदना महाजन यांचे ’फुले-आंबेडकरी विचार आणि स्त्री प्रश्न’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या सोहळयाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment