नांदेड दि. 31 जुलै : नीती आयोगाच्यावतीने जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात आलेल्या संपूर्णता अभियानात आकांक्षित किनवट तालुक्याने 6 निर्देशकांपैकी 4 निर्देशक 100 टक्के पूर्ण केल्यामुळे राज्यातुन तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे. याबद्दल राज्य शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा आयआयएम नागपूर येथे 2 ऑगस्ट 2025 रोजी पदक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधीत संपूर्णता अभियान राबविण्यात आले. देशभरातील 500 तालुके यात सहभागी झाले. या अभियानात आरोग्य, पोषण, कृषी आणि सामाजिक विकास या क्षेत्रांतर्गत 6 निर्देशकांचा समावेश करण्यात आला होता. संपूर्णता अभियानात राज्यातील 27 आकांक्षित तालुक्यानी सहभाग घेतला होता. यात पहिल्या क्रमांकावर चंद्रपूर - जिवती, दुसऱ्या क्रमांकावर वाशीम - मालेगाव, पालघर - जवाहर तर तिसऱ्या क्रमांकावर नांदेड-किनवट, वर्धा - कारंजा, यवतमाळ-पुसद, गडचिरोली-अहेरी, नंदुरबार-अकराणी या आकांक्षित तालुक्यानी स्थान पटकाविला आहे.
समावेशित निर्देशक 'संपूर्णता अभियाना'चे फोकस क्षेत्र
तालुक्यातील गर्भवती महिलांचे पहिल्या तिमाहीतील नोंदणीचे प्रमाण 100 टक्के करणे. तालुक्यातील 30 पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींची उच्च रक्तदाब संदर्भात 100 टक्के तपासणी करणे. तालुक्यातील 30 पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींची मधुमेह संदर्भात 100 टक्के तपासणी करणे. तालुक्यातील गर्भवती महिलांना आयसीडीएसच्या पूरक पोषण आहार वितरण कार्यक्रमांतर्गत 100 टक्के पूरक पोषण आहाराचे वितरण करणे. मृदा आरोग्य तपासणी कार्ड 100 टक्के वितरण करणे. तालुक्यातील महिला स्वयं सहायता समूहाना खेळत्या भांडवलाचे 100 टक्के वितरण करणे.
संपूर्णता अभियानात किनवट तालुक्याची कामगिरी
संपूर्णता अभियानाच्या माध्यमातून आकांक्षित किनवट तालुक्याने तालुक्यातील लक्ष्यित लोकसंख्येच्या तुलनेत मधुमेहासाठी तपासणी, उच्च रक्तदाबासाठी तपासणी, आयसीडीएस कार्यक्रमांतर्गत नियमितपणे पूरक पोषण आहार घेणाऱ्या गर्भवती महिलांची टक्केवारी आणि माती नमुना संकलन लक्ष्याविरुद्ध तयार केलेल्या मृदा आरोग्य कार्डांची टक्केवारी हे 4 निर्देशक 100 टक्के संतृप्त केले आहेत.
संपूर्णता अंतर्गत राबविलेले उपक्रम
महिन्याच्या संपुर्णता अभियान मोहिमेत सदर निर्देशक संतृप्त करण्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. यात मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी संदर्भात - ग्रामपंचायत निहाय उच्च रक्तदाब-मधुमेह तपासणी शिबिरांचे आयोजन, नियमित आढावा, क्षेत्रभेटी, रिक्त पदांची भरती, जनजागृती इत्यादी उपक्रम घेऊन कामास गती देण्यात आली.
पोषण आहार संदर्भात - पोषण आहारासंदर्भात जनजागृती, पौष्टिक आहार मेळा, पोषण परसबाग निर्मिती, आयसीडीएस शिबीरे, नुक्कड नाटक, जागरूकता रॅली, प्रदर्शने, पोस्टर बनवणे, पोषण ट्रॅकर अँप चे प्रशिक्षण, पोषण पंधरवडा व पोषण महाचे आयोजन, माता दिनाचे नियमित आयोजन, जनजागृती पर विभिन्न स्पर्धाचे आयोजन इत्यादी उपक्रम राबविण्यात आले.
मृदा आरोग्य पत्रिका संदर्भात - शेतीशाळाद्वारे गावस्तरावर माती तपासणीच्या अनुषंगाने जनजागृती, गावनिहाय शिबिरांचे आयोजन, कृषी मित्रांची मदत, जिल्हास्तरीय लॅबशी सातत्याने पाठपुरावा, कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून कॅम्पेन मोड वरती माती नमुने गोळा करणे या माध्यमातून दिलेले 1 हजार 500 चे उद्दिष्ट तीन महिन्यात 100 टक्के पूर्ण करण्यात आले.
जिल्हाधिकारी यांचा नीती आयोग व राज्यशासनाच्यावतीने नागपूर येथे सन्मान
या अभियानात तालुक्याने संपूर्णता प्रतिज्ञाद्वारे मोहिमेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी निर्धारित वचनबद्धता 6 पैकी 4 निर्देशक संतृप्त करून यात उल्लेखनीय प्रगती केल्याबद्दल राज्य शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आय आय एम नागपूर येथे 2 ऑगस्ट 2025 रोजी पदक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या समवेत आकांक्षित तालुका किनवटचे गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस व संबंधित आकांक्षित तालुका फेलो हे राज्यस्तरीय सत्कार समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा व तालुका स्तरावर संपूर्णता अभियान सन्मान समारोह
संपूर्णता अभियान मोहिमेत योगदान दिलेल्या संबंधित तालुक्यातील गटविकास अधिकारी यांना पदक व प्रशस्तीपत्र तर तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि संबंधित विभागाचे गाव पातळीवर उल्लेखनीय काम केलेल्या कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment