धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी बौद्ध अनुयायांचा टोल माफ करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी
मुंबई : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी नागपूर, बौद्ध लेणी औरंगाबाद, अकोला तसेच राज्यातील इतर बौद्ध वारसा स्थळांकडे प्रवास करणाऱ्या अनुयायांना टोल माफी मिळावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले आहे. यात त्यांनी नमूद केले आहे की, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. हा ऐतिहासिक दिवस दरवर्षी देशभरातील बौद्ध समाज मोठ्या श्रद्धेने साजरा करतो. यावर्षी १ ते ४ ऑक्टोबर २०२५ दरम्यान लाखो बौद्ध अनुयायी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी प्रवास करणार आहेत. मात्र या प्रवासादरम्यान टोल वसुली केली जाते, ज्यामुळे अनुयायांना आर्थिक भार सहन करावा लागतो.
धम्मचक्र प्रवर्तन दिन हा केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक मुक्तीचा संदेश देणारा ऐतिहासिक दिवस असल्याने राज्य सरकारने टोल माफ करून अनुयायांना दिलासा द्यावा, अशी मागणी आघाडीने केली आहे. या निवेदनाची प्रत नागपूर शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनाही पाठविण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment