नांदेड,२८ :- नांदेड शहरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने शहरातील जनजिवन विस्कळीत झाले असुन नागरीकांच्या मदतीला मनपा प्रशासन धावुन जाऊन मागील दोन दिवसापासुन मतदकार्य करीत आहे. याच पार्श्वभुमीवर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी दिनांक २८.०९.२०२५ रोजी शहरातील सखल भागातील विविध पुरग्रस्त भागांना व महापालिकेने स्थापित केलेल्या निवारा केंद्रांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली आहे.
यावेळी आयुक्तांनी शहरातील नदीपात्रालगत व सखल भागात पाणी शिरल्याने महानगरपालिकेच्या वतीने पाण्याचा निचरा करण्याची प्रक्रिया व नागरीकांच्या स्थलांतरीत प्रक्रियेची पाहणी केली. याचबरोबर आयुक्तांनी महापालिकेने स्थापित केलेल्या तात्पुरत्या निवारण केंद्रास भेट देऊन नागरीकांची विचारपुस केली. मागील दोन दिवसांत महापालिका प्रशासनामार्फत एकुण ९७० नागरीकांना स्थलांतरीत करुन सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. शोध व बचाव कार्यामध्ये महापालिकेच्या अग्निशमन विभागातील अधिकारी के.जी.दासरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष कार्य पार पाडले आहे. निवारा केंद्रात आश्रय घेतलेल्या नागरीकांना महापालिकेतर्फे जेवण, पिण्याचे पाणी इत्यादी जिवणावश्यक वस्तु पुरविण्यात येत असुन सदरील ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता, फवारणी, प्राथमिक आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. याचाच आढावा आयुक्तांनी प्रत्यक्ष निवारा केंद्रास भेट देऊन घेतला आहे. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, नितीन गाढवे, निलेश सुंकेवार, शहर अभियंता सुमंत पाटील, क्षेत्रिय अधिकारी गौतम कवडे यांची उपस्थित होते.
या भेटीदरम्यान मनपा आयुक्तांनी एनटीसी मिलएरिया, पाकीजा फंक्शन हॉल, लिबर्टी फंक्शन हॉल, आणि नंदगिरी किल्ला या निवारा केंद्रांना भेट दिली. महापालिकेच्या निवारा केंद्रावर आश्रय घेतलेल्या आयुक्तांनी पुरग्रस्त भागातील नागरीकांशी संवाद साधुन महापालिका प्रशासन आपणास हवी ती मदत करण्यास तत्पर असल्याचे आश्वासन देऊन आयुक्तांनी नागरीकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे पुराचे पाणी ओसरेपर्यंत निवारा केंद्र कोणत्याही परिस्थितीत न सोडण्याचे आवाहन यावेळी आयुक्तांनी केले तसेच निवरा केंद्र परिसरामध्ये प्रकाश व्यवस्था, साफ-सफाई, फवारणी, इत्यादी बाबींची चोख व्यवस्था ठेवून या सर्व बाबींचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जाईल याची दक्षता घेण्याबाबत सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना आदेशित केले. यावेळी नागरिकांनी महापालिकेमार्फत पुरविन्यात येणाऱ्या सुविधे बाबत समाधान व्यक्त केले आहे.
याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना आयुक्तांनी नदीने 351 मीटरची इशारा पातळीवर ओलांडून 354.89 मीटर ही पातळी सध्या गाठली असून पुढील 24 तास हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याने नदी लगतच्या नागरिकांनी कुठलाही विलंब न करता तात्काळ जवळच्या निवारा केंद्रात स्थलांतरित व्हावे असे आवाहन यावेळी मनपा आयुक्तांनी केले आहे. त्याचप्रमाणे नागरीकांनी शहरात उदभवलेल्या पुरजन्य परिस्थितीत घाबरुन न जाता मदतीसाठी महानगरपालिकेच्या आपत्ती शाखेला किंवा जवळच्या क्षेत्रिय कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment