कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 3 September 2025

कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय


मुंबई   :-  कारखान्यांमधील कामगारांच्या काम करण्याची मर्यादा ९ तासांवरून १२ तास करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज बुधवारी घेतला. दुकाने आणि आस्थापनांमधील कामांच्या तासांची मर्यादा ही ९ तासांवरून १० तास करण्यात आली आहे.

       कारखान्यांमधील कामगारांना एका आठवड्यात (एक दिवसाची रजा वगळता) जास्तीतजास्त ४८ तासच काम देता येते. ही मर्यादा कायम राहणार आहे. याचा अर्थ सरासरी दररोज आठच तास काम कामगारांकडून करून घेता येईल. आधी दररोजच्या कामाच्या तासांची मर्यादा ही नऊ तास इतकी होती. आता ती १२ तास करताना ८ तासांपेक्षा कितीही जास्तीचे काम करवून घेतले तर कामगारांना ओव्हरटाइमचे पैसे द्यावे लागतील. तसेच, ४८ तासांऐवजी आठवड्यात ५६ तास काम करवून घेतलेले असेल तर एक बदली रजा द्यावी लागेल. त्यापेक्षाही अधिक काम करवून घेतले तर त्या प्रमाणात जादा बदली रजा द्याव्या लागतील.

      कामगारांकडून जादा तास काम करवून घेतले जाणार असेल तर त्यासाठी संबंधित शासकीय विभागांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. राज्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक वाढत असताना उद्योगांना अधिक मनुष्यतास उपलब्ध व्हावेत आणि जादाचे काम करणाऱ्या कामगारांना अधिकचे पैसेही मिळावेत या उद्देशाने कारखाने अधिनियम आणि दुकाने व आस्थापना अधिनियमात अशा सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. कारखान्यांमधील कामाचे तास वाढविण्याचा निर्णय हा २० किंवा त्यापेक्षा अधिक कामगार असलेल्या कारखान्यांसाठी लागू राहील.ओव्हरटाईम कामाचा कालावधी १२५ तासांवरुन १४४ तास करणे इत्यादी सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Pages