‘वाटा पळवाटा’ नाटकाचे स्क्रिनिंग व चर्चा – प्रा. दत्ता भगत यांचा विचारप्रवर्तक कार्यक्रम नांदेड विद्यापीठ
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुल आणि ललित व प्रयोगजीवी कला संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध नाटककार, लेखक व समीक्षक प्रा. दत्ता भगत यांचे बहुचर्चित नाटक वाटा पळवाटा याचे स्क्रिनिंग व चर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम मंगळवार, ९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १.३० वाजता माध्यमशास्त्र संकुल, नांदेड येथे होणार आहे.
या कार्यक्रमात नाटकाचे सखोल विश्लेषण आणि त्यामागील विचारधारा यावर चर्चासत्र पार पडणार असून डॉ. शैलजा वाडीकर (प्राध्यापक व इंग्रजी विभाग प्रमुख) यांचे भाष्य होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुनीता पाटील (समन्वयक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र) आणि प्रा. दत्ता भगत (माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन) उपस्थित राहणार आहेत.
यावेळी प्रा. दत्ता भगत हे आपल्या संग्रहातील दुर्मिळ व मौलिक पुस्तके डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रास भेट देणार आहेत. कार्यक्रमासाठी कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर आणि डॉ. पृथ्वीराज तौर उपस्थित राहून आयोजनाला दिशा देणार आहेत.
नाटक आणि त्यामागील विचारांचा आस्वाद घेण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी, संशोधकांनी आणि नाट्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. हा कार्यक्रम नाटकाच्या माध्यमातून विचारांच्या वाटा आणि पळवाटा शोधण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न ठरणार आहे.

No comments:
Post a Comment