महानगरपालिकेतर्फे मतदान जनजागृतीसाठी भव्य रॅली जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या वतीने मतदानाची शपथ तब्बल २००० शालेय विद्यार्थ्यांनी घेतला रॅली मध्ये सहभाग - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 7 January 2026

महानगरपालिकेतर्फे मतदान जनजागृतीसाठी भव्य रॅली जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या वतीने मतदानाची शपथ तब्बल २००० शालेय विद्यार्थ्यांनी घेतला रॅली मध्ये सहभाग

महानगरपालिकेतर्फे मतदान जनजागृतीसाठी भव्य रॅली

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या वतीने मतदानाची शपथ

तब्बल २००० शालेय विद्यार्थ्यांनी घेतला रॅली मध्ये सहभाग



नांदेड,०७ जानेवारी :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणूकीमध्ये मध्ये मतदारांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे बुधवारी दि.०७.०१.२०२६ सकाळी ८.०० वाजता मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये नांदेड शहरातील विविध शाळांच्या एकुण *2000 शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग* नोंदविला होता. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या वतीने *मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. सदर रॅली *जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून तिरंगा पॉईंट येथून प्रारंभ करण्यात आली.


महानगरपालिका निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, यासाठी मतदान जनजागृती अभियाना अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये विविध माध्यमांतील प्रसिद्धी, नागरिकांशी थेट संवाद, पथनाट्य, रांगोळी, रील्स, सेल्फी इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.रॅलीदरम्यान मतदान जनजागृतीचा संदेश देणारे होर्डींग्स शालेय विद्यार्थी दर्शवत होते. तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी स्वाक्षरी बॅनर मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमास महिला व पुरुष नागरिकांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रॅलीमध्ये अग्निशमन दलाच्या गाड्यांचाही सहभाग असून, त्यावरून मतदान जनजागृती करणारी गाणी वाजविण्यात येत होती.


मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, ‘मतदान हा तुमचा अधिकार आहे’, तसेच ‘येत्या १५ जानेवारीला महापालिका निवडणुकीत नक्की मतदान करा’ अशा घोषणांद्वारे नागरिकांना मतदानासाठी प्रेरित करण्यात आले. तिरंगा पॉइंट येथून सुरू झालेली ही रॅली आयटीआय चौक, शिवाजी नगर, कलामंदिर, वजिराबाद चौक, महाविर चौक, असे मार्गक्रमण करत गांधी पुतळा या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला.  रॅलीदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोकशाही सक्षम करण्यासाठी प्रत्येक मत मौल्यवान असून जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, जेष्ठ नागरिक अशोक तेरकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत रिठ्ठे, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, शिक्षणधिकारी नागराज बनसोडे, क्षेत्रिय अधिकारी गौतम कवडे, अग्निशमन अधिकारी के.जी.दासरे, निलेश कांबळे, जनसंपर्क अधिकारी सुमेध बनसोडे, कार्यालय अधिक्षक सतीश कंठाळे व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



समाजमाध्यमांवरुनही मतदारांची जनजागृती


नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेकडून रॅली, पथनाट्य, सेल्फी पॉइंट या पारंपारिक मतदान जनजागृतीच्या पध्दतीव्यतिरिक्त समाजमाध्यमांवरुनही मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. मतदानाचा संदेश देणारे रिल्स, झिंगल्स, प्रमुख अधिकाऱ्यांच्या मुलाखती इत्यादी पालिकेकडून समाजमाध्यंमावर प्रसारित केली जात आहेत.



No comments:

Post a Comment

Pages