एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
१ मार्च २०२६ रोजी प्रवेश परीक्षा
नांदेड, दि. ७ जानेवारी : इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी रविवार १ मार्च २०२६ रोजी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
ही प्रवेश परीक्षा अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांच्या अधिनस्त येणाऱ्या प्रकल्प कार्यालयाअंतर्गत असलेल्या सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील अनुसूचित व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट अंतर्गत ही प्रवेश परीक्षा एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल, सहस्रकुंड, ता. किनवट, जि. नांदेड येथे होणार आहे. इयत्ता सहावीकरिता प्रवेश परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत, तर इयत्ता सातवी ते नववीकरिता सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत घेण्यात येणार आहे.
प्रवेश परीक्षेसाठी विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प कार्यालय, किनवट तसेच प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल, सहस्रकुंड येथे तसेच सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांकडे विनामूल्य उपलब्ध आहेत.
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी, सहावी, सातवी व आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांचे पूर्ण भरलेले विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी दि. ४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट येथे सादर करावेत, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment