अंबरनाथ मध्ये ‘काँग्रेस का हाथ, भाजप के साथ’; ‘एकनाथां’चा सोडला हात - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 6 January 2026

अंबरनाथ मध्ये ‘काँग्रेस का हाथ, भाजप के साथ’; ‘एकनाथां’चा सोडला हात

अंबरनाथ  मध्ये ‘काँग्रेस का हाथ, भाजप के साथ’; ‘एकनाथां’चा सोडला हात




 अंबरनाथ :- अंबरनाथ नगरपालिकेवर भाजपने आपला नगराध्यक्ष बसवल्यानंतर आता सर्वाधिक २७ नगरसेवक असलेल्या शिंदेसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षासोबत हातमिळवणी करीत ‘अंबरनाथ विकास आघाडी’ स्थापन केली असून, या गटाची नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या गटात भाजपचे १४, काँग्रेसचे १२, तर राष्ट्रवादी (अजित पवार)चे चार व एक अपक्ष असे ३१ नगरसेवक आहेत. नगराध्यक्षांसह ही संख्या ३२ होते. अंबरनाथ नगरपालिकेला भ्रष्टाचार आणि भयमुक्त करण्याकरिता हा निर्णय घेतल्याचा दावा भाजपने केला. महापालिका निवडणुकीच्या गदारोळात शिंदेसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

       निवडणुकीच्या निकालानंतर शिंदेसेना सर्वांत मोठा पक्ष ठरला. मात्र, भाजपने नगराध्यक्षपदावर बाजी मारली. शिंदेसेनेसोबत न जाता भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा नारा देत भाजपने अंबरनाथ विकास आघाडी हा गट नोंदणीकृत केला. या आघाडीची स्थापना ही शिंदेसेनेसाठी नवी डोकेदुखी ठरणार आहे.

      अंबरनाथच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेना यांच्यात नगराध्यक्षपदाच्या लढतीत भ्रष्टाचाराचा मुद्दा भाजपने पुढे केला होता. शिंदेसेनेतील काही पदाधिकाऱ्यांना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उघड विरोध दर्शवला असून, सत्तेत त्यांचा सहभाग भाजपला नको होता.

     काँग्रेस आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या दोन्ही पक्षांनी शिंदेसेनेकडे न जाता भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. नवीन आघाडीच्या वाट्याला आता स्वीकृत नगरसेवकांचीही संख्या जास्त येणार असून, सर्व समित्यांवर त्यांचे सदस्य अधिक राहतील.

No comments:

Post a Comment

Pages