नव्या नगराध्यक्षांना विकासाची जबाबदारी; पाणी, स्वच्छता आणि राजकीय संख्याबळाची अडचणे कायम
किनवट : किनवट नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सुजाता विनोद एंड्रलवार यांनी मंगळवारी (ता. ५) मान्यवरांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदाचा अधिकृत प्रभार स्वीकारला. या पदग्रहणाने शहराच्या विकासाला नवी गती मिळेल, अशी आशा नागरिकांमध्ये निर्माण झाली असली तरी प्रत्यक्षात त्यांच्यासमोर पाणीपुरवठा, स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि राजकीय आव्हाने यांसारख्या गंभीर समस्या उभ्या आहेत. या समस्या सोडवण्यातच त्यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी राहणार आहे.
शहरातील सर्वात ज्वलंत प्रश्न म्हणजे पाणीपुरवठा. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या वाढीव पाणीपुरवठा नळयोजनेवर १९ कोटी ५ लाख रुपये खर्च झाले असूनही हे काम अद्याप पूर्ण झाले नाही. नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत भाजपला पराभवाचा फटका बसण्यामागे हेच एक प्रमुख कारण होते. आजही नागरिकांना अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा सहन करावा लागत असून, उन्हाळ्यात टँकरवर अवलंबून राहावे लागते. कंत्राटदाराने प्रकल्पात मोठा उशीर केला असून, सुमारे १० कोटी रुपयांचे अंतिम बिल मागितले आहे. मात्र, काम पूर्णपणे दर्जेदार झाल्याशिवाय देयक अदा करू नये, अशी तीव्र मागणी नागरिकांकडून होत आहे. नगराध्यक्षांनी या प्रकल्पाला प्राधान्य देऊन तातडीने पूर्ण करणे अपेक्षित आहे.याशिवाय, शहरातील स्वच्छतेची स्थिती देखील चिंताजनक बनली आहे. घनकचरा व्यवस्थापनात गंभीर त्रुटी आहेत. रस्त्यांवर साचलेला कचरा, डंपिंग ग्राउंडची अस्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणांवरील अस्वच्छता यामुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा धोका वाढला आहे. शहरात अद्यापही पुरेशी सार्वजनिक प्रसाधनगृहे नाहीत, विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणी येत आहेत. कचरा वर्गीकरण, नियमित संकलन आणि नवीन कचरा प्रक्रिया केंद्र उभारणे यांसारख्या उपाययोजना तातडीने लागू करणे गरजेचे आहे. अन्यथा, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आणखी गंभीर होईल.राजकीयदृष्ट्या देखील नव्या नगराध्यक्षांसमोर मोठे आव्हान आहे. नगरपरिषदेत विरोधी बाकावर असलेल्या भाजप महायुतीकडे संख्याबळाचे बहुमत नाही.परंतु, त्यांना प्रशासन चालवण्याचा दीर्घ अनुभव आहे.
सत्ताधारी आघाडीला निर्णयप्रक्रियेत संतुलन साधावे लागेल, अन्यथा विकासकामे रखडण्याची शक्यता आहे. भाजपकडून आधीच्या काळातील रखडलेल्या प्रकल्पांवर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.एकूणच, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, दिवा पुरवठा आणि इतर मूलभूत नागरी सुविधा यांची प्रभावी अंमलबजावणी हीच सुजाता एंड्रलवार यांच्या नेतृत्वाची खरी परीक्षा असेल. किनवटच्या नागरिकांना त्यांच्याकडून ठोस निर्णय, पारदर्शक प्रशासन आणि जलद विकासाची अपेक्षा आहे. येत्या काळात शहराचा विकास आलेख उंचावेल की खाली येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment