किनवट येथे सुधारित हस्तशिल्प साधनसामग्री वितरण कार्यक्रम संपन्न
किनवट, दि. १७ : भारतीय हस्तशिल्प परंपरेचा वारसा जपत स्थानिक कलाकारांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय हस्तशिल्प विकास कार्यक्रम (NHDP) अंतर्गत सुधारित साधनसामग्री वितरण कार्यक्रम (ITDP) आज (ता. १७) महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, गोकुंदा (ता. किनवट) येथे आयोजित करण्यात आला.
हा कार्यक्रम वस्त्र मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. कार्यक्रमाची अंमलबजावणी भारत क्रीडा व्यायाम शिक्षण प्रसारक मंडळ(जालना ) या संस्थेमार्फत करण्यात आली.
या उपक्रमास हस्तशिल्प विकास आयुक्त कार्यालय तसेच हस्तशिल्प सेवा केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांचे प्रायोजकत्व लाभले.
या कार्यक्रमात लाकूड कोरीवकाम (Wood Carving) या हस्तकला प्रकारावर विशेष भर देण्यात आला. “माझे हस्तशिल्प – माझा अभिमान” या संकल्पनेतून स्थानिक कारागिरांना आधुनिक साधनसामग्री, प्रशिक्षण व बाजारपेठेची दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
केंद्र शासनाच्या हस्तकला विभागामार्फत किनवट परिसरातील सुतारकाम करणाऱ्या ५० कामगारांना प्रत्येकी सुमारे रुपये १२,००० किमतीचे सुधारित साधनसामग्री किट वितरित करण्यात आले. यामुळे कारागिरांची कार्यक्षमता वाढून त्यांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने नवी चालना मिळणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतपर भाषणांनी झाली. अमन कुमार जैन यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट केली. प्रा. सुबोध सर्पे यांनी सूत्रसंचालन केले. माहूर येथील भाग्यवान भवरे व शेषेराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशांत ठमके होते. अध्यक्षीय समारोपात ते म्हणाले,
“भारतीय हस्तशिल्प ही आपली ओळख आहे. पिढ्यान्पिढ्या चालत आलेली कला जपणे व तिला आधुनिक काळाशी जोडणे ही काळाची गरज आहे. आजच्या लाकूड कोरीवकाम प्रशिक्षण व किट वितरणामुळे स्थानिक कारागिरांना साधनसामग्रीबरोबरच आत्मविश्वास मिळेल. आत्मनिर्भर भारत संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी असे उपक्रम अत्यंत आवश्यक आहेत.”
कार्यक्रमाच्या शेवटी जालना येथील संस्थेचे अध्यक्ष समाखान पठाण यांनी आभार प्रदर्शन केले. हा उपक्रम “आत्मनिर्भर भारत” आणि “स्वच्छ भारत – स्वच्छतेकडे एक पाऊल” या राष्ट्रीय संकल्पनांना बळ देणारा ठरला असून, स्थानिक कारागिरांसाठी नव्या संधींचे दालन खुले झाले आहे.

No comments:
Post a Comment