मनुवादी व्यवस्थेविरुद्ध लढा उभारणे गरजेचे; रोहितला अजूनही न्याय नाही
- सचिन निकम
शिक्षणाचा बाजार फोफावत आहे; कौशल्य आधारित शिक्षण म्हणजे मनुवादाचे पुनरुज्जीवन
छ. संभाजीनगर : रोहित वेमुला यांनी शैक्षणिक क्षेत्रातील जातीयवादाला आव्हान देण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांचा संस्थात्मक खून करणारी व्यवस्था आजही दलित-बहुजन-अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा छळ करत आहे. बलिदानाच्या नऊ वर्षांनंतरही रोहित वेमुला यांना न्याय मिळालेला नाही, रोहित प्रमाणे लाखों विद्यार्थी आजही भेदभावाविरोधात संघर्ष करत आहेत. याला सरकार जबाबदार आहे, अशी तीव्र टीका सचिन निकम यांनी केली.
ते रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने आयोजित शहीद रोहित वेमुला यांच्या शहीद दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य गेटजवळ आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलत होते.
तसेच हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणी रोहित दलित नसल्याचे कारण देत क्लोजर रिपोर्ट देऊन यात जातीवाद झाला नाही असे म्हणून न्याय नाकारला आहे.
सुप्रीम कोर्टाने 2025 मध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये जातीय भेदभाव विरोधात कडक यंत्रणा तयार करण्याची गरज अधोरेखित केली आहे. या संदर्भात रोहित वेमुला आणि इतर समान प्रकरणे घेण्यात आली होती परंतु सरकारला याचे गांभीर्य नाही याबाबत रोष व्यक्त केला.
यावेळी नामांतर शहीद अविनाश डोंगरे यांच्या भगिनी अंजली कांबळे, ऑल इंडिया इन्शुरन्स एस.सी., एस.टी. असोसिएशनचे सुरेंद्र कांबळे, पाली भाषेचे तज्ज्ञ प्रा. प्रफुल्ल गडपाल (लखनऊ) यांची विशेष उपस्थिती होती.
व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष अधिक तीव्र करावा लागेल. सर्वच क्षेत्रांत मनुवाद जिवंत ठेवण्यासाठी धर्माच्या नावावर दहशतवाद पोसला जात आहे. याला सरकारमधील मनुवादी विचारांचे पाठबळ आहे. शाळा, महाविद्यालये व वसतिगृहे अशा सर्वच ठिकाणी दलित विद्यार्थ्यांना भेदभावाची वागणूक दिली जात आहे. दलित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलतींना अजित पवार यांसारखे मंत्री उघड विरोध करत आहेत. केंद्रीय विद्यापीठांच्या नावाखाली छळछावणीसदृश व्यवस्था उभी करण्यात आली आहे. सार्वजनिक शिक्षणव्यवस्था मोडीत काढून खाजगी विद्यापीठांत शिक्षणाचा बाजार मांडला जात आहे. शिक्षणपद्धतीत मोठे दोष असतानाही ‘कौशल्याधारित अभ्यासक्रम’ या गोंडस नावाखाली जातिआधारित शिक्षणातून मनुवाद पुन्हा जिवंत करण्यात आला आहे. या विषयी अनेकांनी चिंता व्यक्त केली तर शहीदांच्या बलिदानाचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सार्वजनिक विद्यापीठांना उध्वस्त करून खाजगी विद्यापीठांची संख्या वाढवली जात आहे, सरकारी शाळा बंद केल्या जात आहेत, मराठी उर्दू माध्यमातील शाळा बंद करणे हे गोरगरिबांना शिक्षण नाकारण्याचे षडयंत्र हणून पाडण्यासाठी विद्यार्थी पालकांचा संयुक्त उठाव आवश्यक आहे परंतु लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी यंत्रणा काम करत आहे ही धोक्याची वेळीच ओळखली पाहिजे असे मत सुरेंद्र कांबळे यांनी व्यक्त केले.
विद्यार्थी प्रतिनिधी रत्नदीप रगडे व बाळू गायकवाड यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास राष्ट्रपाल गवई, बालाजी सोनवणे, किरण मगरे, सुमेध नरवडे, मंथन गजहंस, रणजित म्हस्के, अतुल चव्हाण, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे संदीप तुपसमुद्रे, भीमराव वाघमारे, राहुल जाधव, किशोर तूपविहरे, विनोद बनकर, ॲड. विशाल थोरात, ॲड. तुषार अवचार, सनी देहाड, कृष्णा घोडे, प्रवीण कांबळे, राजेश बिजवले, नितीन करंगळे, यशपाल माने, सोहेल पिंजारे, सम्यक त्रिभुवन, अतुल वानखेडे, अतुल ढगे, नामदेव राठोड, जय कांबळे, भीमराव चव्हाण, आशिष गर्जे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment