हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या स्वागतासाठी नांदेड नगरी सज्ज ; जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण ; कार्यक्रमासाठी प्रवेश पासची आवश्यकता नाही - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 23 January 2026

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या स्वागतासाठी नांदेड नगरी सज्ज ; जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण ; कार्यक्रमासाठी प्रवेश पासची आवश्यकता नाही

 हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या स्वागतासाठी नांदेड नगरी सज्ज ; जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण ; कार्यक्रमासाठी प्रवेश पासची आवश्यकता नाही




नांदेड, दि. २३ जानेवारी :- नांदेड येथे उद्यापासून दोन दिवस “हिंद-दी-चादर” अंतर्गत शिखांचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली असून भाविकांच्या स्वागतासाठी नांदेड नगरी सज्ज झाली आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.


या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शनिवार २४ जानेवारी रोजी सकाळी श्री गुरु ग्रंथ साहिब नगर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे भव्य महानगर कीर्तन सकाळी ८ वाजता गुरुद्वारा गेट क्रमांक १ येथून प्रारंभ होऊन गुरुद्वारा चौक – महावीर चौक – वजिराबाद मार्केट – वजिराबाद चौक – तिरंगा चौक – रामसेतू दादरा – रवी नगर – नागार्जुन पब्लिक स्कूल – मामा चौक या मार्गाने मोदी मैदान, मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहे.


या मार्गावरील सर्व नागरिकांनी आपल्या घरांसमोर व दुकानांसमोर रंगीबेरंगी फुले, रांगोळी, विद्युत रोषणाई व दिव्यांच्या माध्यमातून सजावट करून पालखीचे स्वागत करावे व या भव्य महानगर कीर्तनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


हा कार्यक्रम दोन्ही दिवस सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. कार्यक्रमस्थळी येण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मोफत वाहनसेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, भाविकांसाठी भव्य लंगरची व्यवस्था करण्यात आली असून देश-विदेशातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमस्थळी आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे देखील आयोजित करण्यात आली आहेत.


हिंद-दी-चादर कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रवेशासाठी कोणत्याही पासची आवश्यकता नाही.


श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त २४ व २५ जानेवारी रोजी आयोजित हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.




No comments:

Post a Comment

Pages