विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजनाला बळ; डॉ. व्यंकटेश काब्दे यांची सदिच्छा भेट - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 6 January 2026

विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजनाला बळ; डॉ. व्यंकटेश काब्दे यांची सदिच्छा भेट

 विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजनाला बळ; डॉ. व्यंकटेश काब्दे यांची सदिच्छा भेट



नांदेड  : नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, माजी खासदार तसेच वैद्यकीय सेवेला आयुष्य समर्पित केलेले व्यक्तिमत्त्व डॉ. व्यंकटेश काब्दे यांची विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजनासंदर्भात सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीत संमेलनाच्या वैचारिक अधिष्ठानासह सामाजिक-सांस्कृतिक उद्दिष्टांवर सखोल चर्चा झाली.

   विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे मुख्य संघटक किशोर ढमाले यांनी संमेलनाची भूमिका, उद्दिष्टे, तसेच नांदेड शहरात राबविण्यात येणाऱ्या नियोजित उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. विद्रोही परंपरेतून सामाजिक परिवर्तनाला चालना देणे, बहुजन-शोषित घटकांचे प्रश्न साहित्याच्या माध्यमातून मांडणे आणि समकालीन वास्तवावर निर्भीड चर्चा घडवून आणणे, हा संमेलनाचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी डॉ. काब्दे यांनी सकारात्मक चर्चा करत संमेलनास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. साहित्य, संस्कृती आणि लोकशाही मूल्ये यांचा परस्परसंवाद अधिक व्यापक करण्यासाठी अशा संमेलनांची गरज अधोरेखित करत, नांदेडसारख्या सांस्कृतिकदृष्ट्या सकस शहरात होणारे विद्रोही साहित्य संमेलन समाजप्रबोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

    या सदिच्छा भेटीत डॉ. अनंत राऊत, डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. विजयकुमार माहुरे तसेच दत्ता तुमवाड उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्याची भूमिका दर्शवली.साहित्य, संस्कृती आणि सामाजिक परिवर्तनाच्या विद्रोही परंपरेला बळ देणाऱ्या या संवादातून संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबाबत आशादायी वातावरण निर्माण झाले असून, नांदेडच्या सांस्कृतिक जीवनात हे संमेलन एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Pages