मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे विराजमान; पाणीपट्टी दरवाढ रद्द करण्यासह 'टँकर माफिया मुक्त' मुंबईचा संकल्प
मुंबई : - महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी संजय घाडी यांची बिनविरोध निवड झाली आहे. पालिका सभागृहात बुधवारी या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. पीठासीन अधिकारी तथा पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांच्या नावाची घोषणा केली. विरोधी पक्षाकडून कोणीही उमेदवारी अर्ज न भरल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
महापौरपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रितू तावडे यांनी मुंबईकरांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुंबईकरांची दरवर्षी होणाऱ्या पाणीपट्टी दरवाढीच्या जाचातून मुक्तता करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी होणाऱ्या ८ टक्के दरवाढीला स्थगिती देऊन पाण्याचे दर स्थिर ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे. यासोबतच मुंबईला 'टँकर माफिया' मुक्त करण्यासाठी विशेष धोरण राबवले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
आपल्या सहा पानी भाषणातून नवनिर्वाचित महापौरांनी मुंबईच्या विकासाचे 'व्हिजन' मांडले. यामध्ये पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, महापालिका शाळांचा दर्जा सुधारणे, अग्निशमन दलाचे सक्षमीकरण, सार्वजनिक स्वच्छतागृहे, पार्किंग व्यवस्था, गावठाणांचा विकास आणि खड्डेमुक्त रस्ते यांवर भर देण्यात आला आहे. तसेच, मुंबईतील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विशेष आराखडा तयार केला जाईल.
पाणीपुरवठ्याबाबत सविस्तर माहिती देताना त्या म्हणाल्या की, आगामी पाच वर्षांत प्रलंबित पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण करून शहराला अतिरिक्त पाणी उपलब्ध करून दिले जाईल. पाणी गळती रोखण्यासाठी प्रत्येक विभागात अद्ययावत यंत्रणा आणि कॅमेरे बसवण्यात येतील. तसेच समान पाणी वितरणासाठी 'फ्लो मीटर' बसवले जातील आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या नागरिकांना जलदेयकांमध्ये (पाण्याच्या बिलात) दिलासा दिला जाईल. महायुतीच्या 'विकसित मुंबई, सुरक्षित मुंबई' या वचनाशी आम्ही कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

No comments:
Post a Comment